Pune Crime News | डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंटच्या कामास विलंब झाल्याने आर्किटेक्टचे अपहरण करुन मारहाण करुन कोर्‍या चेकवर सही घेतल्याच्या  आरोपावरुन एकाला अटक

Pune Crime News

पिंपरी/ पुणे : Pune Crime News |  जागेच्या डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट करण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरुन तिघांनी आर्किटेक्टचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन कोर्‍या चेकवर सह्या घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.  याप्रकरणी रावेत पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुस्सा गौस शेख Mussa Gaus Shaikh (वय ३१, रा. देहुरोड बाजार, देहुरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिवाकांत तिवारी (रा. के व्हिला सोसायटी, किवळे),याचा चालक असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुरज नाथाजी पाटील (वय ३१, रा. सिल्व्हर गार्डनिया सोसायटी, रावेत, मुळ रा. पिंपळे, ता. पन्हाळा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रावेत येथील कन्नु की चाय रेस्टॉरंटजवळून ते विश्रांतवाडी येथे २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज पाटील हे आर्किटेक्ट आहेत. किवळे येथील विकासनगर येथील जागा विकसित करण्याकरीता संबंधीत जागेचे शेतकरी यांच्याशी त्यांची ओळख होती. ही जागा विकसित करण्याकरीता शिवाकांत तिवारी व जागा मालक यांच्यामध्ये डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट करण्याचे काम पाटील यांच्यामार्फतीने चालू होते. दरम्यानच्या काळात फिर्यादी व जागा मालक यांना शिवाकांत तिवारी यांनी काही रक्कम या कामासाठी दिली आहे. काही कारणास्तव डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट करण्यास विलंब होत असल्याने याबाबत शिवाकांत तिवारी यांनी यापूर्वी फिर्यादी यांना दमदाटी केली होती, २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता शिवाकांत तिवारी यांनी फिर्यादी यांना फोन करुन रावेतमधील कन्नु की चाय येथे बोलावले.

फिर्यादी हे तेथे पोहचल्यावर त्यांनी डेव्हलेपमेंट अ‍ॅग्रीमेंट करीता वेळ का लागत आहे, अशी दमदाटी केली. शिवाकांत तिवारी यांनी मुस्सा शेख व चालक याच्या मदतीने टोयोटा कारमध्ये पाटील यांना बळजबरीने बसवुन त्यांचे अपहरण केले. पाटील यांना हाताने मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने बँकेच्या कोर्‍या चेक वर सही घेऊन त्यांना दुपारी साडेतीन वाजता विश्रांतवाडी येथे सोडले, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक अनिल टार्फे तपास करीत आहेत.

You may have missed