Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag, Pune | श्री महालक्ष्मी देवीला 2 किलो सोन्याचा मुकुट ! महालक्ष्मी मंदिरातील सार्वजनिक नवरात्रोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच नारी शक्तीचा होणार सन्मान (Video)
पुणे : Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag, Pune | सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील महालक्ष्मी देवीला भक्ताने २ किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असून घटस्थापनेच्या दिवशी महालक्ष्मी देवीला हा नवा सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. यामुळे भक्तांना मुकुट परिधान केलेले देवीचे मनोहारी रुप पाहण्याची संधी पहिल्या दिवसापासून मिळणार आहे. नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमासोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेला मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, राजू चमडिया आदी उपस्थित होते.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव रविवार, ११ ऑक्टोंबर २०२६ (घटस्थापना) ते मंगळवार २० ऑक्टोंबर २०२६ (दसरा) या कालावधीत साजरा होणार आहे.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी (घटस्थापना) सकाळी ९ वाजता बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होईल. ‘शृंगार’ या संकल्पनेवर आधारित मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येणार असून मंदिराचे भव्य प्रवेशद्वार देखील या संकल्पनेवर साकारले जाणार आहे. याशिवाय दहा दिवसांत अभिषेक, याग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
सोन्याचा मुकुटावर ६ महिने कलाकुसर
राठोड ज्वेलर्सचे संजय राठोड व त्यांच्या कारागीर सोन्याचा मुकुट व त्यावर कलाकुसर करण्यासाठी ६ महिने मेहनत घेत होते. त्याचबरोबर एका भक्ताने स्फटिक माळ व रुद्राक्षांची माळ अर्पण केली आहे. या दोन्ही माळ्यांमध्ये ६०० ग्रॅम सोने वापरण्यात आले आहे. कावेडिया ज्वेलर्स यांनी या तयार केल्या असून येत्या पंचमीला त्या देवीला अर्पण करण्यात येणार असल्याचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी सांगितले.
सामुहिक श्रीसूक्त पठण आणि महिलांचा सन्मान सोहळा
उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, नवरात्राच्या दुसर्या दिवशी दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता सामूहिक महिला व पुरुष यांच्यासाठी श्रीसूक्त पठण होणार आहे. यामध्ये हजारो महिला व पुरुष देवीभक्त सहभागी होणार आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यावेळी उपस्थित राहणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार (दि.१२) पासून दररोज सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिला शक्तीचा सन्मान मंदिरात होणार आहे. यामध्ये अनुक्रमे अन्नदाता शक्ती : महिला शेतकरी व कृषी उद्योजिका, महिला शास्त्रज्ञ, महिला पोलीस अधिकारी, महिला वैमानिक, महिला जिल्हाधिकारी, विविध कंपन्यांमधील महिला मानव संसाधन व्यवस्थापक, नारी तू नारायणी : उल्लेखनीय कार्य करणाºया महिला, महिला उद्योजिकांच्या सन्मान सोहळ्याचा समावेश आहे.
यंदाचे वैशिष्ट्य : अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक, जिवंत देखावा
मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. तसेच ललिता पंचमीला गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता कन्यापूजन कार्यक्रम आणि शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी गाथा शिवशंभूंची हा जिवंत देखावा ही यंदाच्या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
याशिवाय रक्तदान व आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ढोल-ताशा वादनसेवा, नृत्यातून देवी आराधना, बँजो वादन, माता की चौकी यासह सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता मंदिरासमोर सामूहिक गरबा होणार आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे.
दसरा : श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी व रावण दहन कार्यक्रम
दसर्याच्या दिवशी मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. तर रात्री ९.३० वाजता भव्य दिव्य रावणदहन कार्यक्रम देखील होणार आहे. विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भव्य रावणाची प्रतिकृती साकारली आहे. उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत.
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ५ कोटी रुपयांचा विमा घेण्यात आला आहे व मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५० हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे विश्वस्त मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.
