Pune Crime News | कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडणार्याला फरासखाना पोलिसांनी केले अवघ्या 8 तासात जेरबंद
पुणे : Pune Crime News | ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडून ६० हजार रुपयांची रोकड चोरुन पळून गेलेल्या चोरट्याचा माग काढून फरासखाना पोलिसांनी अवघ्या ८ तासात अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्याचा माग काढला.
संग्राम राजेंद्र जाधव Sangram Rajendra Jadhav (वय २९, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. संग्राम जाधव हा कोल्हापूरचा राहणारा असून त्याची तिकडे शेती आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे. कौटुंबिक कारणावरुन त्याची मनस्थिती बिघडलेली आहे. त्यातून तो १५ दिवसांपासून पुण्यात आला आहे. तो पुणे रेल्वे स्टेशनवर झोपत होता. त्याच्याकडील पैसे संपल्याने त्याने आदल्या दिवशी सर्वत्र पाहणी केली. त्यानंतर मंदिरातील दानपेटी फोडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने दानपेटी फोडल्यानंतर त्यातील काही रक्कम बँक खात्यात भरल्याचे सांगतो. पोलिसांनी त्यांच्याकडून १८ हजार रुपये जप्त केले आहेत.
श्री कसबा गणपती मंदिराचा मुख्य दरवाजा सोमवारी रात्री बंद करण्यात आला. मध्यरात्री दरवाज्याची कडी उचकटून गाभार्यातील दानपेटी फोडून रोकड चोरून नेण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर मंदिराच्या पुजारी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. फरासखाना पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्याला पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंदिरातील दानपेटी फोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.
त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमीत खुट्टे, प्रशांत पालांडे यांनी श्री कसबा गणपती मंदिर, जिजामाता बाग, गणेश रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात संशयित चोरटा आढळून आला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी जाधव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दानपेटी उचकटून रोकड चोरल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, राजेश महाला, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, प्रणिल चौगले, हवालदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमीत खुट्टे, प्रशांत पालांडे, श्रीकांत वाघवले, विशाल शिंदे, विशाल ओैटी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव, चेतन होळकर यांनी केली.
