Pune Crime News | भररस्त्यात जबरी चोरी करणार्या, मोक्का कारवाई झालेल्या टोळीतील 5 वर्षे फरार असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने आंध्र प्रदेशातून केले जेरबंद, रामदेव बाबा ढाब्यावर करत होता काम
पुणे : Pune Crime News | वारजे परिसरात गुंडागर्दी करुन दहशत पसरवून भर रस्त्यात जबरी चोरी करणार्या टोळीवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली. टोळीतील ५ जणांना अटक केली. परंतु, एक गुंड मात्र गेल्या ५ वर्षांपासून फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकाने या गुंडाला आंध्र प्रदेशातून जेरबंद केले आहे.
राजुराम लिचमणराम ऊर्फ लक्ष्मण गेहलोत Rajuram Lichmanram, alias Laxman Gehlot (वय २७, मुळ रा. डाऊ, ता. जायल, जि. नागोर, राजस्थान) असे या गुंडाचे नाव आहे. तो आंध्र प्रदेशातील पलनडू जिल्ह्यातील दचेपल्ली येथील एका ढाब्यावर काम करत होता.
ही घटना वारजे येथील यश मित्र मंडळ चौकात १३ मार्च २०२१ रोजी रात्री ११ वाजता घडली होती. याप्रकरणी विकास विष्णु जानावळे (वय २६, रा. वसुंधरा वनविकास सोसायटी, गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरुन गौरव पासलकर, मंगेश जडीतकर, पल्ल्या चौधरी, राजू गेहलोत व इतरांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विकास जानावळे हे इंटेरिअर डेकोरेटर म्हणून काम करत होते. तेव्हा ते एका चहाच्या टपरीवर काम करत होते. तेथील व्यवसायाचे ३३०० रुपये घेऊन ते रिक्षाने आईबरोबर जात होते. वडील मोटारसायकलवरुन मागून येत होते. यश मित्र मंडळ चौकात दुचाकीवरुन आलेल्या गौरव पासलकर, मंगेश जडीतकर, पल्लया चौधरी, राजू गेहलोत यांनी रिक्षा अडवून विकास यांना बाहेर ओढले. त्यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील ३३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आईच्या तोंडावर दगड मारला. मागून आलेल्या वडीलांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या आरडाओरड्याने रस्त्याने जाणारे येणारे मदतीसाठी धावले. तेव्हा या गुंडांनी त्यांच्याकडील कोयते फिरवत, जर तुम्हीमध्ये पडला तर तुमचे तुकडे तुकडे करुन टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर हे गुंड पळून गेले होते. याप्रकरणातील ५ जणांना अटक केली. त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का कारवाई केली होती. परंतु, त्यांच्यातील राजूराम गेहलोत हा पळून गेला होता. तो काही अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाकडून वेगवेगळ्या गुन्ह्यातील फरार आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस अंमलदार अतुल साठे व आशिष राठोड यांना गोपनीय बातमी मिळाली, राजूराम गेहलोत हा आंध्र प्रदेशात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आशिष राठोड, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे हे पथक आंध्र प्रदेशातील पलनडुमधील दचेपल्ली येथे रवाना झाले. तेथील नार्केटपल्ली अडक्की महामार्गावरील बाबा रामदेव ढाबा येथे राजूराम गेहलोत हा काम करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी १४ ऑक्टोंबर रोजी त्याला जागेवरच अटक केली. त्याला पुण्यात आणून कोथरुडचे सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या हवाली केले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पी आर पाटील, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आशिष राठोड, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांनी केली आहे.
