Pune Crime News | पुणे : लोणावळ्यात आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीच्या कॉल सेंटरचा पर्दाफाश! 20 युवकांना अटक, इरफान शेख मुख्य सूत्रधार असल्याचा संशय

Pune Crime News | Pune: International cyber fraud call center exposed in Lonavala! 20 young men arrested, Irfan Sheikh suspected to be the main conspirator

पुणे (लोणावळा) : Pune Crime News |  अमेरिका, कॅनडासह विविध देशांतील नागरिकांना नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या बेकायदा कॉल सेंटरचा लोणावळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोणावळ्यातील नांगरगाव हद्दीतील ओमेगा सोसायटीमधील देव व्हिला येथे सुरू असलेल्या या कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. या कारवाईत लॅपटॉप, मोबाइल, वाहने आणि रोकड असा एकूण ३६ लाख ४१ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीचा मुख्य सूत्रधार म्हणून इरफान अब्दुल गफूर शेख (रा. मालवणी, मालाड, मुंबई) याचे नाव समोर आले असून, तो या कॉल सेंटरचा मालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नामांकित कंपन्यांच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून देव व्हिला भाड्याने घेतला होता. या ठिकाणी बेकायदा कॉल सेंटर सुरू करून इंटरनेट आणि विविध मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून परदेशातील नागरिकांशी संपर्क साधला जात होता.

आरोपी अमेझॉन, गुगल यांसारख्या नामांकित कंपन्यांचे बनावट दस्तऐवज आणि ओळखपत्रे तयार करून स्वतःला संबंधित कंपन्यांचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवत होते. विविध योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची वैयक्तिक माहिती तसेच बँक खात्यांशी संबंधित गोपनीय तपशील मिळवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून खंडणी

या टोळीकडून काही नागरिकांना त्यांच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जात होती. त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे.

तसेच क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डची गोपनीय माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

इरफान शेख मुख्य सूत्रधार; क्रिप्टो आणि हवाला व्यवहारांचा संशय

या प्रकरणात इरफान अब्दुल गफूर शेख हा प्रमुख सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या मालकीचे हे कॉल सेंटर मो. फैज ऊर्फ नाजिश आरिफ शेख याच्या मदतीने चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

परदेशातील नागरिकांकडून फसवणुकीद्वारे मिळवलेली रक्कम हवाला आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भारतीय चलनात रूपांतरित केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू आहे.

२० जणांना अटक; बहुतांश आरोपी १९ ते २६ वयोगटातील

अमान इम्तियाज शेख, नाजिश आरिफ शेख, रिहान सलम घनानी, महंमद अलीरजा सय्यद, तावीश मेहबूब अली शेख, कामरान इसामुद्दीन शेख, सद्दाम चाँद खान, झहिर वाहिद खान, जाहीद आजम शेख, शादाब जावेद सय्यद, इरफान अब्दुल गफूर शेख, समीर इरफान शेख, इरशाद इरफान शेख, अमीर सिराज खान, मकसूद शमीम चौधरी, महंमद अफजल शेख हशंद शेख, अब्दुल आहात महंमद रफिक खान (सर्व रा. मालवणी, मालाड, मुंबई), कुलदीप मनोज बागडी, सुजल खुमबहादूर राणा, धनराज देवजित बोस (रा. बदलापूर, ठाणे) अशी बेकायदा कॉल सेंटर प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  बहुतांश आरोपींचे वय १९ ते २६ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.

फसवणूक, खंडणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात २० आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, खंडणी आणि अन्य संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम व इंडियन टेलिग्राफ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत.

You may have missed