Pune FDA News | स्वयंपाकघरात जिवंत-मृत झुरळे आढळल्याने ‘डॉमिनोज’चे पुण्यातील वारजे, हिंगणे खुर्द, चाकण आणि कोल्हापुरातील 2 आस्थापनांचे परवाने ‘एफडीए’कडून निलंबित

Pune FDA News | 'Domino's' outlets in Warje, Hingne Khurd, Chakan in Pune, and 2 outlets in Kolhapur had their licenses suspended by the FDA after finding live and dead cockroaches in the kitchen.

पुणे : Pune FDA News |  पुणे आणि कोल्हापूरमधील डॉमिनोज पिझ्झाच्या पाच आस्थापनांमध्ये गंभीर अस्वच्छता आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) त्यांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. पुण्यातील वारजे, हिंगणे खुर्द, चाकण आणि राजारामपुरी (कोल्हापुर) व छत्रपती संभाजीनगर (कोल्हापुर) येथील आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

एफडीएने १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी पुणे विभागातील डॉमिनोजच्या ५० हून अधिक आस्थापनांची विशेष तपासणी केली. या तपासणीत स्वयंपाकघर आणि अन्नपदार्थ साठवण्याच्या ठिकाणी जिवंत झुरळे तसेच मृत झुरळांचे अवशेष आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तपासणी दरम्यान शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी वापरण्यात येणारी भांडी व उपकरणे योग्य प्रकारे स्वतंत्र ठेवली जात नसल्याचे निदर्शनास आले. तसेच अन्नपदार्थांची अस्वच्छ साठवणूक, साफसफाईतील त्रुटी, तापमानाच्या अपुऱ्या नोंदी आणि स्वच्छतागृहातून दुर्गंधी येत असल्याचेही आढळले. काही खाद्यपदार्थ वितरण कर्मचाऱ्यांकडे आवश्यक ओळखपत्रे नसल्याचे समोर आले.

या गंभीर त्रुटींमुळे वारजे, हिंगणे खुर्द आणि कोल्हापुरातील दोन आस्थापनांचे परवाने १४ ऑक्टोबर रोजी, तर चाकण येथील आस्थापनाचा परवाना १५ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आला.

नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे, यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

You may have missed