Pune Crime News | महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 6 जणांची 13 लाखांची फसवणूक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन ६ जणांची १३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत सचिन बबन भालेराव (वय ४३, रा. जगतापनगर, थेरगाव गावठाण) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन संतोष वाल्हेकर (वय ४०, रा. नायडु हॉस्पिटल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ढोले पाटील रोडवरील बोट क्लब रोडवर मे २०२५ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपींची महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात ओळख झाली होती. त्याने फिर्यादी व त्यांच्या ५ मित्रांना पुणे महापालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. त्यांच्याकडून कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता त्यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ७२ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने वर्षभर नोकरी लावण्याचे नुसते आश्वासन दिले. प्रत्यक्षात नोकरी मात्र लावली नाही. त्यामुळे या तरुणांनी  ३ महिन्यांपूर्वी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी होऊन बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही हद्द कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याची येत असल्याने तो कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करीत आहेत.

You may have missed