Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग : श्री महासरस्वती देवीला स्फटिक माळ, तर श्री महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण
पुणे : Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ निमित्त भक्तिमय वातावरणात श्री महासरस्वती देवीच्या चरणी पवित्र स्फटिक माळ, तर श्री महाकाली देवीच्या चरणी रुद्राक्ष माळ अर्पण करण्यात आली.
श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या तीन रूपांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या तिन्ही देवींचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.
ज्ञान, विद्या, बुद्धी आणि निर्मळतेचे प्रतीक असलेल्या श्री महासरस्वती देवीला स्फटिक माळ अर्पण करण्यात आली. स्फटिक हे पवित्रता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर शक्ती, साहस आणि दुष्ट प्रवृत्तींच्या संहाराचे प्रतीक असलेल्या श्री महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण करण्यात आली. रुद्राक्षाला हिंदू धर्मपरंपरेत विशेष आध्यात्मिक महत्त्व असून त्याचा भगवान शिवाशी घनिष्ठ संबंध मानला जातो. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात देवींच्या चरणी करण्यात आलेले हे माळार्पण श्रद्धा, भक्ती आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडविणारे ठरले.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे सुरू असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
