Mumbai High Court | दिवाळीतही रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी कायम! वर्षभर निर्बंध लागू राहणार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Mumbai High Court | Ban on bursting crackers on the streets continues even during Diwali! Restrictions will stay all year round; important order from the Mumbai High Court

मुंबई : Mumbai High Court | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. सार्वजनिक रस्ते, मार्ग, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास असलेली बंदी केवळ एका सणापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण वर्षभर आणि सर्व उत्सवांदरम्यान लागू राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी (१५ ऑक्टोबर) न्यायमूर्ती गिरीश एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ध्वनी आणि वायू प्रदूषणासंदर्भातील प्रकरणाची सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयाने गणेशोत्सवादरम्यान दिलेला अंतरिम आदेश केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दिवाळीसह वर्षभर साजऱ्या होणाऱ्या सर्व सण-उत्सवांमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास मनाई राहणार आहे.

तसेच रुग्णालये, शाळा, न्यायालये आणि अन्य अधिसूचित शांतता क्षेत्रांमध्येही लागू नियमांनुसार फटाके फोडण्यास बंदी असणार आहे.

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्राप्त तक्रारींवर कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेल्या धोक्याची दखल घेत उच्च न्यायालयाने यापूर्वी या प्रदूषणाच्या प्रश्नावर स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली होती.

फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

दरम्यान, फटाक्यांच्या उत्पादनावर किंवा विक्रीवर सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सार्वजनिक रस्ते आणि प्रतिबंधित ठिकाणी फटाके फोडण्यावर हे निर्बंध लागू आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

You may have missed