Pune Graduate Constituency | ‘विजय निश्चित, तोही मोठ्या मताधिक्यानेच!’; पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांचा पंढरपुरात विश्वास
पंढरपूर : Pune Graduate Constituency | पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असून, तो मोठ्या मताधिक्याने होईल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी व्यक्त केला आहे. पंढरपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या जनसंपर्काचा उल्लेख करत भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. (Harshada Deshmukh-Jadhav)
‘निवडणुकीची तयारी कालपासून केलेली नाही’
“मी काल उठून आज निवडणुकीची तयारी केलेली नाही. गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघात सातत्याने काम करत आहे. अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि पदवीधरांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सर्वांनाच चांगले परिवर्तन घडवायचे आहे,” असे हर्षदा देशमुख-जाधव यांनी सांगितले.
मतदार नोंदणीपासूनच पदवीधरांशी संपर्क निर्माण केला असून, सध्याचा दौरा हा त्या संपर्काची उजळणी करण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यादरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
सुशिक्षित बेरोजगार आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य
सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, तरुणांच्या रोजगाराच्या संधी आणि पदवीधरांच्या समस्या यावर सातत्याने काम करत असल्याचे देशमुख-जाधव यांनी सांगितले. गेल्या दीड-दोन वर्षांत निर्माण झालेल्या जनसंपर्कामुळे निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंढरपुरात पदवीधर मतदार आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी
पंढरपूर दौऱ्यादरम्यान हर्षदा देशमुख-जाधव यांनी शहरातील पदवीधर मतदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. तसेच माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज भोसले, बाळासाहेब यलमर, संग्राम काटकर यांच्यासह पदवीधर मतदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
