Satara Accident | कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन ठरले अखेरचे! कराडजवळ भीषण अपघातात साताऱ्याच्या 4 तरुणांचा मृत्यू; 3 मित्र गंभीर जखमी
सातारा : Satara Accident | दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या सात मित्रांवर काळाने घाला घातला. पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड शहराजवळील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ गाडीने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले.
या भीषण दुर्घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.
महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव येथील सात मित्र दसऱ्यानिमित्त स्कॉर्पिओ गाडीने कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण रात्री गावाकडे परतत होते.
रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कराडजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांच्या स्कॉर्पिओची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झाला.
चार मित्रांचा जागीच मृत्यू; तिघांवर उपचार सुरू
या अपघातात तेजस देशमुख (वय २५, चालक), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
तर ऋतुराज दुबळे (वय २१), शंतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नुकत्याच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या या सहापदरी उड्डाणपुलावरील हा पहिलाच मोठा जीवघेणा अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कातरखटाव गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.
