Pune Crime News | रुम भाड्याने देण्याच्या नावाखाली डिपॉझिट घेऊन रुमचा ताबा न देता पोलिसाची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | आईच्या मालकीची असलेली रुम भाड्याने देण्याच्या नावाखाली डिपॉझिट घेऊन काका पुतण्याची साडेसहा लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मोहम्मद गाजी लाडन सय्यद (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोनाली महादु गिरी /सोनाली सचिन गोसावी (रा. येरवडा) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कलवड वस्तीतील गिरी निवास येथे १६ फेब्रुवारी २०२४ पासून घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद हे मुंबई पोलीस दलात सध्या कार्यरत आहेत. त्यांचे काका फारुक मुस्तफा बिजापुरे यांनी सोनाली गिरी हिच्या आईच्या मालकीची कलवड वस्ती येथील गिरी निवासमधील रुम भाड्याने घेतल्या होत्या. रुमचे काही काम बाकी असल्याने त्यांनी डिपॉझिट म्हणून तिला तीन लाख रुपये दिले होते. तिने ३ वर्षाचे लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स अ‍ॅग्रिमेंट केले होते. त्यांची पत्नी गर्भवती असल्याने त्यांनाही खोलीची गरज होती. त्यामुळे त्यांनीही रुम भाड्याने घेण्यासाठी डिपॉझिट म्हणून ४ लाख रुपये सोनाली गिरी हिला दिले.

१४ मार्च २०२४ ते १३ मार्च २०२६ पर्यंत अशा दोन वर्षाची लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट करुन २ रुमचा ताबा देण्याचे ठरविले होते. त्यांनी सोनाली गिरी हिच्याकडे रुमचा ताबा देण्याची मागणी केली. तिने थोडे काम बाकी आहे, असे सांगून थोड्या दिवसात रुमचा ताबा देत असल्याचे सांगितले. त्यांनी वेळोवेळी मागणी केल्यानंतरही तिने रुमचा ताबा दिला नाही. पैसेही परत केले नाही. दोन वर्षे होऊन गेले तरी रुमचा ताबा दिला नसल्याने शेवटी त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. तेव्हा तिने फिर्यादी यांना ५० हजार रुपये परत दिले. त्यानंतरही उरलेले पैसे परत न केल्याने शेवटी त्यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले तपास करीत आहेत.

You may have missed