Pune Crime News | पुणे : दाम्पत्याने दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ‘मोरपंख सारीज’च्या मालक मोहिनी औताडे यांचा आरोप; गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | कापड व्यवसायात मदतीसाठी घेतलेल्या महिलेने तिच्या पतीलाही मदतीसाठी घेतले. त्या दोघांनी दुकानातील खरेदी विक्रीचा तपशील नष्ट करुन १ कोटी ५९ लाख २३ हजार ८१४ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन दाम्पत्यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पूनम मनोज शिराळ (Poonam Manoj Shiral) आणि मनोज दिंगबर शिराळ Manoj Digambar Shiral (दोघे रा. खराडी, चंदननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मोहिनी दत्तात्रय औताडे (वय ४३, रा. सरस्वती अपार्टमेंट, चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान चंदननगर येथील मोरपंख सारीज येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहिनी औताडे यांचा नेक्स्ट लेव्हल लक्झरी या नावाने कापड दुकानाचा व्यवसाय २०२१ मध्ये सुरु केला होता. त्यांनी या दुकानात मदत करण्यासाठी पुनम शिराळ यांना नोकरीवर ठेवले होते. पुनम यांनी मार्केटिंग तसेच ऑनलाईन व ऑफलाईन विक्रीचे काम पूर्णपणे पाहण्याचे व दुकानाच्या कामकाजाची जबाबदारी घेतली होती. दुकानासाठी केलेल्या गुंतवणूक व व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत त्यांना नफ्यातील हिस्सा नको असे सांगितले. काही दिवसांनी त्यांचा भाऊ राहुल पाटील याला दुकानात मदतनीस म्हणून ठेवण्यात आले. दुकानाचा व्यवसाय वाढविल्यावर दुकानाचे नाव बदलुन मोरपंख सारीज असे ठेवण्यात आले.

जुलै २०२५ मध्ये चंदननगर येथील मुख्य बाजारात त्यानी दुकान सुरु केले.मोहिनी यांनी पतीच्या नावावर मालमत्ता तारण ठेवून एकूण ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. चंदननगर भाजी मार्केट येथे मोरपंख सारीज हे दुकाने सुरु केले. मनोज शिराळ यांना दुकानाच्या कामासाठी ठेवण्यात आले. त्यांच्याकडे दुकानाची ऑनलाईन व ऑफलाईन विक्री, विक्रीसंबंधी हिशोब व आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी देण्यात आली. दुकानातील रोख विक्रीतून जमा होणारी रक्कम मनोज शिराळ व पुनम शिराळ हे त्यांच्याकडेच ठेवत होते. ऑनलाईन विक्रीतून प्राप्त होणारी रक्कम फिर्यादी यांच्या खात्यावर जमा होत होती. त्यांच्यावर विश्वास असल्याने फिर्यादी यांनी बँक अ‍ॅक्सेस देखील त्यांना दिला होता. तसेच मोरपंख सारीजचा सोशल मीडिया अ‍ॅक्सेसही त्यांना देण्यात आला होता. डिजिटल मार्केटिंग टीमच्या मदतीने त्यांनी मोरपंख सारीजची खाती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल, सॉफ्टवेअर खरेदी करण्यास त्यांनी परवानगी दिली.

सर्व व्यवहार शिराळ पतीपत्नीकडे होता. प्रथम दुकानासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करुन त्यानंतर व्यवसायातील नफ्याचे वाटप करायचे होते. पुनम यांनी फिर्यादी यांच्या पतींना कर्जाचे हप्ते काही दिवस त्यांनी भरावेत व मार्केटमधील व्यापार्‍यांचे पैसे परत केल्यानंतर दुकानातून नफा काढून घेता येईल, असे संगितले. काही दिवसांनी त्यांनी हिशोबाबाबत विचारल्यावर त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांच्या मनात हिशोबाबाबत संशय निर्माण झाला. त्यांनी दुकानाचे सी ए संग्राम भोईटे यांच्याकडे दुकानातील आर्थिक व्यवहाराची माहिती मागितली. तेव्हा त्यांनी तुमच्या दुकानाचा खरेदी विक्रीचा तपशील उपलब्ध करुन दिलेला नाही. तसेच कामगारांचा तपशील मागितला असता ते देण्यास टाळाटाळ करत असल्याने मला हिशोब करता आला नाही, असे सांगितले. त्यांनी पुनम व मनोज शिराळ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये अडचण निर्माण झाल्याने हा डाटा सी ए यांना देणे शक्य होत नाही, असे कारण देऊन टाळाटाळ केली. त्यानंतर सी ए यांनी दुकानात लक्ष देऊन स्वत: उपलब्ध खरेदी विक्री व्यवहारांच्या व अकाऊंटिंग नोंदी घेतल्या़ त्याचे आधारे ऑगस्ट २०२५ ते ७ जुलै २०२६ या कालावधीअखेर एकूण १ कोटी ५९ लाख २३ हजार ८१४ रुपये इतकी रोख रक्कम शिल्लक असल्याचे दरम्यानचे नोंदीवरुन दिसून येत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले.

याबाबत पुनम व मनोज शिराळ यांना विचारणा केल्यावर त्यांनी पैसे मार्केटमध्ये असल्याचे सांगितले. परंतु, कोणाकडे किती आहेत, याचा काही तपशील, हिशोबर काय आहे, याबाबत त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. त्यांच्या दुकानाच्या व्यवसायातून प्राप्त झालेल्या रक्कमेचा अपहार केला. तसेच ही रक्कम वाघोली येथील मोरपंख फॅशन या दुकानाच्या व्यवसायामध्ये वापरण्यात आली असल्याची फिर्यादी यांना शक्यता वाटत आहे असा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरण्यात येणारा त्यांचा मोबाईल दुकानातून फिर्यादी यांचे पती दत्तात्रय औताडे हे घेऊन आले होते. पुनम व मनोज शिराळ, त्यांचा भाऊ राहुल पाटील हे ७ जुलै २०२६ रोजी दत्तात्रय औताडे यांच्या क्लिनिकमध्ये आले. तेथे पतीसोबत वाद घातला. तसेच तुमच्या ओपीडीसमोर लाईव्ह करुन तुमच्या तोंडात मारेन, तुमची बदनामी करीन व तुम्हाला चंदननगर मार्केटमध्ये फिरु देणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तेथून ते मोबाईल घेऊन गेले. त्यांच्याकडे सोशल मीडियाचा अ‍ॅक्सेस परत मागितल्यावर त्यांनी तो देण्यास नकार दिला. तसेच पुनम शिराळ यांनी सोशल मीडियावर ऑनलाईन लाईव्ह येऊन मोरपंख सारीज हे दुकान बंद असल्याचे व दुकानाचे फोन नंबर बंद असल्याचे सांगत आहे.

त्यामुळे दुकानाच्या ग्राहकांची दिशाभूल होत असून दुकानाची व माझी बदनामी होत आहे़. परिणामी माझ्या व्यवसायाच्या प्रतिष्ठेला बाधा येऊन व्यवसायाचे आर्थिक नुकसान होत आहे़. चंदननगरमधील मोरपंख सारीज दुकानातील माल काढून घेऊन वाघोली येथे मोरपंख फॅशन या नावाने दुकान सुरु करुन व्यवसाय चालविला आहे. तसेच त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या दुकानाच्या जीएसटी क्रमांकाचा वापर करुन मालाची खरेदी करुन मोरपंखचे नावावर एजंटाद्वारे मागवून तो वाघोली येथे घेऊन जात आहे. जीएसटी क्रमांकाचा वापर करुन मोरपंख फॅशन वाघोली व फुलराणी साडीज आळंदी येथे एकूण ३३ लाख ९१ हजार ६९१ रुपयांचा मालाचे वितरण केले आहे. चंदननगर येथील दुकानातील व्यवहारात १ कोटी ५९ लाख २३ हजार ८१४ रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच या कालावधीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले. व्यवसायाच्या मालमत्तेचा, सोशल मीडिया खात्याचा व जीएसटी क्रमांकाचा गैरवापर केला असल्याचे आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आले आहेत.

You may have missed