Pune Crime News | बसमध्ये गुंगीकारक गोळ्या खाण्यास देऊन लुटणार्‍या 63 वर्षाच्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी उज्जैनमधून केली अटक; नागपूर, द्वारकासह तीन गुन्हे उघडकीस

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | डॉक्टरी व्यवसायाच्या ज्ञानाचा गैरफायदा घेऊन प्रवासात सिनिअर सिटिझन्सना गुंगीकारक गोळ्या खाण्यास देऊन लुटणार्‍या ६३ वर्षाच्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी उज्जैन येथून अटक केली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात या गुन्हेगाराने शिक्षा भोगली आहे. त्यानंतरही तो पुन्हा असेच गुन्हे करत फिरतो.

बाबु भुरेखान (वय ६३, रा. ऋणिजागाव, ता़ सीतामऊ, जि. मंदसौर, मध्यप्रदेश) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. स्वारगेट बरोबर नागपूर येथील रामटेक पोलीस ठाणे व गुजरातमधील द्वारका येथील एक असे ३ गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक २० ऑगस्ट २०२६ रोजी बोरवली ते स्वारगेट असा शिवशाही बसने प्रवास करत होते. या ज्येष्ठ नागरिकाला संजय अगरवाल असे बनावट नाव सांगणार्‍याने गुंगीच्या गोळ्या सेवन करण्यास देऊन त्यांच्या उजव्या हाताच्या बोटामधील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरुन नेली होती.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बस मधील सीसीटीव्ही फुटेजवरुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत तपास करुन बाबु भुरेखान याचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला उज्जैन येथून अटक केली आहे. त्याच्याकडून प्रवाशांना ALPRAX 0.5 गुंगीची गोळ्या असलेल्या १५ गोळ्यांची २ पाकीटे जप्त करण्यात आली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले की, या गुंगीच्या गोळ्या खाल्याने या ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती खुप बिघडलेली होती. त्यांना बसमधून थेट आयसीयुमध्ये दाखल करण्याची वेळ आली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे बाबु भुरेखान याला उज्जैनमधून अटक केली. तो उज्जैनच्या जवळच असलेल्या गावात राहतो. तेथे त्याची पत्नी, मुले आहेत.

डॉक्टरी व्यवसायातील त्याला चांगले ज्ञान आहे. त्या आधारे तो बस किंवा रेल्वेने जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना हेरायचा. ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना आरोग्याच्या कोणत्यातरी समस्या असतातच. त्यांच्याशी बोलण्यातून तो आपले डॉक्टरी ज्ञानाद्वारे भुलवित असे. त्यांना ४ ते ५ गुंगीच्या गोळ्या खाण्यात देत. त्याने ज्येष्ठ नागरिकाला गुंगी आली की, त्यांच्या अंगावरील, खिशातील दागिने, रोकड काढून घेऊन तो अगोदरच उतरत असे. अशा गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगल्यानंतरही आता आयुष्याच्या उतरार्धातही तो अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळणारे गुन्हे पुन्हा करु लागला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, प्रदिपसिंग सोदे यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळु शिरसट, पोलीस अंमलदार प्रदिप शिंदे, किरण रघतवान, नितीन क्षीरसागर, रमेश चव्हाण, अक्षय भोगे, युवराज राठोड, सोमनाथ बटुळे, किरण ढापकर, रोहित पोवार यांनी केली आहे.

You may have missed