Pune Crime News | हर्षल हॉलचे मालक शााम कासट यांची बनावट सही करुन संमतीपत्र बनवुन ते शासकीय कार्यालयात वेगवेगळे दाखले काढण्यासाठी वापर करुन फसवणुक केल्याच्या आरोपावरुन अथर्व केटरर्ससह 6 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | स्टॅम्प पेपरवर बनावट व खोटी सही करुन बनावट संमतीपत्र बनवुन त्याचा शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात वापर करुन अथर्व केटरर्सच्या नावाने वेगवेगळे दाखले काढण्यासाठी वापर करुन अथर्व केटरर्स हे भाडेकरू असल्याचे दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपावरुन अथर्व केटरर्सच्या मालकासह ६ जणांवर अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याअगोदर केटरिंगचा व्यवसाय आणि जागेच्या ताब्यावरुन झालेल्या वादात अथर्व केटरर्सच्या वतीने प्रकाश चव्हाण यांच्या तक्रारीवरुन शाम कासट आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत शाम हरिविलास कासट (वय ६९, रा. कर्वे रोड, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निशा योगेश जोशी Nisha Yogesh Joshi (वय ५२), प्रिया समीर सरदेसाई Priya Sameer Sardesai (वय ४६), श्रीपाद प्रकाश चव्हाण Shripad Prakash Chavan (वय ४८), चंद्रशेखर अशोकराव खेडेकर Chandrashekhar Ashokrao Khedekar (वय ४३), योगेश रवींद्र जोशी Yogesh Ravindra Joshi (वय ५१), समीर सरदेसाई (वय ४८) आणि सिद्धेशा गडीयार (वय ४५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० ऑक्टोंबर २०२० पासून आतापर्यंत सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रोडवरील हर्षल हॉल हा शाम कासट यांच्या मालकीचा आहे. तेथील केटरिंगची व्यवस्था अर्थव केटरर्स कडे सोपविण्यात आली. जागेच्या ताब्यावरुन त्यांच्यात वाद झाल्याने काही दिवसांपूर्वी शाम कासट व त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कासट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी यांनी संगनमत करुन १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर संमतीपत्र बनवून त्यामध्ये फिर्यादीच्या मिळकतीमधील १ हजार स्क्वे फुट जागा अथर्व केटरर्सला भाडे कराराने दिली असल्याचे नमूद केले. ते शासकीय, निमशासकीय कार्यालयात परवाने काढण्यासाठी दिले असल्याचे नमूद करुन त्यामध्ये लिहून देणार म्हणून फिर्यादीची बनावट व खोटी सही केली़ लिहून घेणार म्हणून अथर्व केटरर्स भागीदार यांनी त्यांचे स्वत:ची सही करुन बनावट संमतीपत्र बनवून त्याचा शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात अथर्व केटरर्सच्या नावाने वेगवेगळे दाखले काढण्यासाठी वापर करुन अथर्व केटरर्स हे भाडेकरु असून त्यांना फिर्यादीच्या मालकीच्या व ताब्यात असलेल्या हर्षल हॉल येथील जागेत हक्कप्राप्त झाला आहे, असे भासवुन फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय येसणे तपास करीत आहेत.
