Mahadev Kamble Death News | पुण्यातील दलित चळवळीचे झुंजार नेते महादेव कांबळे यांचे निधन; वयाच्या ५० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे : Mahadev Kamble Death News | दलित चळवळीतील झुंजार नेतृत्व आणि रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस महादेव कांबळे (वय ५०) यांचे मंगळवारी (२७ ऑक्टोबर २०२६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आंबेडकरी चळवळीत शोककळा पसरली आहे.
महादेव कांबळे हे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून परिचित होते. नागरिकांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारे, मनमिळाऊ आणि दिलदार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
दलित चळवळीतील विविध प्रश्नांवर त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीने एक लढवय्या कार्यकर्ता व जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व गमावल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महादेव कांबळे यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी रात्री ९.३० वाजता हडपसर-माळवाडी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाबद्दल कांबळे परिवार, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
