Pune Crime News | मांजरी (पुणे) : ‘‘तू इथे कमवून खायला आलेला आहेस, तुला नीट राहायला येत नाही का’’; भाईगिरी करणार्‍या गुंडांकडून वाहन चालकाच्या छातीत वार, जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  हॉटेलबाहेरील पान शॉपजवळ थांबलेल्या तरुणाला टोळक्याने तू येथे कमवून खायला आलेला आहेस, तुला नीट राहायला येत नाही का, असे धमकावुन त्याच्या छातीवर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.  मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

या घटनेत सिद्धार्थ बसवराज स्वामी (वय २७, रा. ढेरे बंगल्याजवळ, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्यावर योग हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहे. ही घटना मांजरीतील गोपाळपट्टी येथील शिवशाही हॉटेलजवळ १५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अभिषेक संतोष पात्रे Abhishek Santosh Patre (वय २२) आणि रोहन उत्तम मांढवे Rohan Uttam Mandhave (वय २२, दोघे रा. मांजरी) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार प्रवीण भारती, नीलेश कुतरवाडे, अखिलेश होनमाने (सर्व रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी वाहन चालक म्हणून काम करतात.  १५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता स्वामी हे हॉटेल शिवशाही येथे गेले होते. स्वामी यांचा आरोपींशी कोणताही वाद झाला नव्हता. ते पानशॉप जवळ थांबले असताना प्रवीण भारती, निलेश कुतरवाडे, अखिलेश होनमाने, अभिषेक पात्रे, रोहन मांढवे  हे  तेथे आले. त्यांनी “तू  इथे कमवून खायला आलेला आहेस, तुला नीट राहायला येत नाही का?,” असे म्हणून शिवीगाळ केले. “तुला जिवंत सोडणार नाही. तुला मारून टाकेन,” असे म्हणून त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रवीण भारती याने हातातील लोखंडी हत्याराने त्यांच्या छातीत वार करून गंभीर जखमी केले. त्यांनी हातातील हत्यारे हवेत फिरवून “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर खल्लास करू” असे म्हणून दहशत पसरवली. पोलीस उपनिरीक्षक शुभम म्हेत्रे तपास करीत आहेत.

You may have missed