Pune Crime News | तरुणीला अडवुन मारहाण करुन गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन नेणाऱ्या चोरट्यांना लोकांनी मारहाण करुन केले पोलिसांच्या हवाली
पुणे : Pune Crime News | रस्त्याने पायी जाणार्या तरुणीला दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी अडवुन तिला मारहाण केली. तिच्या गळ्यातील पावणे दोन लाखांची सोन्याची चैन हिसकावली. या तरुणीने आरडा ओरडा केल्याने रस्त्याने जाणार्या लोकांनी या तिघांना मारहाण करुन बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी एकाला अटक करुन त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
विकी सूर्यकांत राऊत Vicky Suryakant Raut (वय २६, रा. सदनगड कॉलनी चाळ, रहाटणी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सोमवार पेठेत राहणार्या एका ३३ वर्षाच्या तरुणीने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिक्षण घेत आहेत. त्या १५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता जेवणानंतर त्या फेरफटका मारण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. नेहरु मेमोरियल हॉल येथून परत रोझरी स्कूल कडे जात असताना साधारण ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेल ब्ल्यु चौक ते विधान भवन चौक येथे जात असताना कोनार्क इस्टेट सोसायटी गेट समोरील रोडवर पाठीमागून एका दुचाकीवरुन तिघे जण आले. त्यांनी या तरुणीचा रस्ता अडविला. तिच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यावर त्यांनी तिला मारहाण करुन सोन्याची चैन ओढली. तिने जोरजोरात आरडाओरडा केला. तेव्हा चोरट्यांनी सोन्याची चैन ओढली. अर्धी चैन या तरुणीच्या हातात राहिली. तिने आरडा ओरडा केल्याने रस्त्यावरुन जाणार्या लोकांनी थांबून या तिघांना पकडले. तेव्हा त्यांनी लोकांशी झटापट करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लोकांनी मारहाण करुन त्यांना बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी विकी राऊत याला अटक केली असून त्याच्याबरोबरील दोघे अल्पवयीन आहेत. बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.
