Pune BJP News | रोहित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; भाजयुमोचे पुण्यात आक्रमक ठिय्या आंदोलन!
मुख्यमंत्र्यांवरील आरोपांच्या निषेधार्थ अलका टॉकीज चौक दणाणला; रोहित पवारांचे कटआउट उलटे लटकवून जोरदार घोषणाबाजी
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मफलर मॅन नव्हे, तर संपूर्ण देशाला परिचित असलेले इन्फ्रा मॅन आहेत; विकासाची स्पर्धा करता येत नसल्यानेच आरोपांचे राजकारण!” – दुष्यंत मोहोळ
पुणे : Pune BJP News | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचा तीव्र निषेध नोंदवत भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहराच्या वतीने आज अलका टॉकीज चौक येथे आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रोहित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर त्यांचे कटआउट उलटे लटकवून कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. रोहित पवारांच्या राजकारणाचा जाहीर निषेध करत भाजयुमोने आक्रमक पवित्रा घेतल्याने अलका टॉकीज चौकात आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो पुणे शहराचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी केले. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार शब्दांत हल्लाबोल करत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुष्यंत मोहोळ म्हणाले, “देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत, संयमी आणि विकासाभिमुख मुख्यमंत्र्यांवर बेताल आरोप करून राजकीय प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी थांबवावा. दोन वर्षांपूर्वीच्या लग्नसमारंभातील एका छायाचित्राचा संदर्भ देत आज द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची राजकीय संस्कृती, त्यांचे कार्य आणि त्यांची विकासदृष्टी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अशा जुन्या छायाचित्रांचा आधार घेऊन जनतेची दिशाभूल करता येणार नाही.”
पुढे बोलताना मोहोळ यांनी रोहित पवारांच्या राजकीय भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, “अजितदादा पवार यांच्या निधनापूर्वीच PR एजन्सीच्या माध्यमातून अजितदादांची राजकीय जागा त्यांचे पुतणे घेणार, अशा आशयाची प्रतिमानिर्मिती आणि प्रचारमोहीम सुरू असल्याचा आरोप उपस्थित होत आहे. अजितदादांच्या राजकीय वारशाबाबत अशा प्रकारचे कथानक उभे करण्यामागचा नेमका हेतू काय होता, याचे उत्तर रोहित पवारांनी द्यावे. महाराष्ट्राच्या जनतेला राजकीय मार्केटिंग नको, तर प्रामाणिक नेतृत्व आणि विकासकामे हवी आहेत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा उल्लेख करताना दुष्यंत मोहोळ यांनी रोहित पवारांना थेट आव्हान दिले. “देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी विकासकामांच्या बाबतीत स्पर्धा करण्याची रोहित पवारांची क्षमता नाही. त्यामुळेच विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी आरोप, संभ्रम आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे. देवेंद्रजी केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, तर पायाभूत सुविधांच्या विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. त्यांची ओळख ‘मफलर मॅन’ म्हणून नव्हे, तर ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून संपूर्ण देशात आहे. मेट्रो, महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून त्यांनी विकासाचा नवा मानदंड निर्माण केला आहे. रोहित पवारांनी आरोपांची स्पर्धा करण्यापेक्षा विकासकामांची स्पर्धा करून दाखवावी,” असा घणाघात मोहोळ यांनी केला.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ आणि रोहित पवार यांच्या आरोपांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. रोहित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आणि त्यांचे कटआउट उलटे लटकवून करण्यात आलेला निषेध हे आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने आक्रमक भूमिका घेत रोहित पवारांच्या राजकारणाविरोधात आपला संताप व्यक्त केला.
“मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक आरोप करून महाराष्ट्राच्या विकासाची दिशा बदलता येणार नाही. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामागे भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता खंबीरपणे उभा आहे. खोट्या आरोपांना आणि द्वेषाच्या राजकारणाला रस्त्यावर उतरूनही उत्तर देण्याची आमची तयारी आहे,” असा निर्धार यावेळी दुष्यंत मोहोळ यांनी व्यक्त केला.
आंदोलनास पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या आंदोलनास भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहराचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, सरचिटणीस प्रणव गंजीवाले, सूचित देशपांडे, प्रवीण वनशिव, समन्वयक आशिष सुर्वे, माऊली उंदरे, किरण ओरसे, सागर शेटे, संकेत शितोळे, तेजस मारणे, योगेश खाटपे, श्रेयस लेले, अथर्व कुलकर्णी, शलाका जेऊर, आदिती बाबर, अनुराग मिश्रा, सुमित चौगुले, शिवम बालवडकर, हर्षवर्धन तुपे, अमेय तुपे, साहिल रजपूत, जागृती विचारे, पौर्णिमा अनासपुरे, पंकज गीते, ओम रणशिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
