Commercial LPG Cylinder Price Hike | एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का; व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला, किती रुपयात मिळणार सिलिंडर?
मुंबई : Commercial LPG Cylinder Price Hike | एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक धक्का बसला असून, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम म्हणून ही दरवाढ करण्यात आल्याचे मानले जात आहे.
नवीन दरानुसार व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे १९ किलो गॅस सिलिंडरचा दर २००० रुपयांच्या पुढे गेला आहे. याचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे तसेच लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांवर होणार असून, त्यांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे. आज १९ किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल २१८ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असले, तरी अलीकडील काळात वाढीचा कल अधिक दिसून येत आहे. मार्च महिन्यातही दरवाढ झाली होती आणि आता एप्रिलमध्ये पुन्हा वाढ झाल्याने व्यावसायिक क्षेत्रातील आर्थिक ताण अधिक वाढला आहे.
दरम्यान, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी व्यावसायिक क्षेत्रासाठी ही वाढ चिंतेची बाब ठरत आहे. या दरवाढीचा परिणाम पुढील काही दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमतींवर दिसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, हॉटेल व्यवसायिकांना वाढत्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
