Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा; 33 जिल्ह्यांत वादळी वारे, गारपिटीची शक्यता

rain

पुणे :  Maharashtra Weather Alert | ऐन उन्हाळ्यात राज्यावर अवकाळी पावसाचे संकट पुन्हा गडद झाले असून, १ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागात वादळी पाऊस, जोरदार वारे आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ३३ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता असून, ताशी ३० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. परिस्थितीचा अंदाज घेऊन २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर अधिक तीव्र परिस्थिती अपेक्षित असलेल्या ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा धोका अधिक असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर आणि सातारा या भागांत पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असल्याने येथेही ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह तुरळक गारपीट होऊ शकते.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत परिस्थिती अधिक गंभीर राहू शकते. तसेच विदर्भातही वादळी पाऊस, गारपीट आणि वेगवान वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात काही भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता कायम असून उकाडा आणि पावसाचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

दरम्यान, ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीज पडणे, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांमुळे शेती व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

You may have missed