Premium Petrol and Diesel Hike | सर्वसामान्यांना इंधनदरांचा झटका; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महागले
Premium Petrol and Diesel Hike | इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रीमियम इंधनांच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने आपल्या प्रीमियम श्रेणीतील इंधनांच्या किमती वाढवल्या असून, ‘XP100’ या 100-ऑक्टेन पेट्रोलचा दर दिल्लीत प्रतिलिटर 149 रुपयांवरून 160 रुपयांपर्यंत नेण्यात आला आहे.
तसेच ‘एक्स्ट्रा ग्रीन’ या प्रीमियम डिझेलचाही दर वाढला आहे. या डिझेलची किंमत प्रतिलिटर 91.49 रुपयांवरून 92.99 रुपये इतकी झाली आहे. हे नवे दर IOCL च्या सर्व विक्री केंद्रांवर लागू करण्यात आले आहेत.
दरवाढीमागील नेमके कारण कंपनीने अधिकृतपणे स्पष्ट केलेले नसले, तरी जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि वाढलेला वाहतूक खर्च हे यामागचे प्रमुख घटक मानले जात आहेत. या वाढीचा सर्वाधिक फटका वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांना बसण्याची शक्यता आहे.
