Bhavani Peth Palkhi Halt | पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा
Bhavani Peth Palkhi Halt | आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवण्यात आल्याच्या चर्चांना स्पष्टपणे अफवा ठरवले आहे. तसेच पुण्यातील मुक्कामाचा एक दिवस कमी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचेही संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमुळे वारकरी आणि भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नियोजन बैठकीत भवानी पेठेतील वाढती गर्दी, अपुरी जागा आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यायांवर चर्चा झाली होती. मात्र, याचा अर्थ मुक्काम बदलण्याचा निर्णय झालेला असा होत नाही. अधिकृत कार्यक्रम पत्रिकेनुसार माउलींचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच कायम आहे.
संस्थानच्या म्हणण्यानुसार, भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी जागेच्या उपलब्धतेबाबत आणि पर्यायी व्यवस्थांबाबत जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. वारकरी प्रतिनिधी, दिंडी मालक, फडकरी आणि प्रशासन या सर्वांना विश्वासात घेऊन 13 एप्रिल रोजी आळंदीत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संस्थानने केले आहे.
