Loni Kalbhor Pune News | विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तरुणी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली; लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलातील घटना

Loni Kalbhor Pune News | Due to a power outage, a young woman was stuck in a lift for a full 14 hours; incident at MIT Educational Complex in Loni Kalbhor

पुणे : Loni Kalbhor Pune News | लोणी काळभोर येथील एम आयटी शैक्षणिक संकुलातील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये १९ वर्षाची तरुणी तब्बल १४ तास अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही तरुणी लिफ्ट मध्ये अडकली. संपूर्ण रात्र तिला लिफ्टमध्ये काढावी लागली. त्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर या तरुणीची सुटका झाली.

याबाबतची माहिती अशी, वाघोली येथील राहणारी ही विद्यार्थीनी लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती लिफ्टने खाली येत होती. त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट पाचव्या आणि सहाव्या मजल्यादरम्यान अचानक बंद पडली. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत विद्यार्थी व इतर लोक खाली आल्याने तिचा आरडाओरडा कोणाला ऐकायला आला नाही. संपूर्ण रात्री तिला अंधारात आणि अन्न पाण्याविना लिफ्टमध्ये काढावी लागली.

मुलगी वेळेत घरी न आल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. लोणी काळभोर पोलिसांकडे त्यांनी ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रारही दिली. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, तिचा ठावठिकाणा लागत नव्हता.

दरम्यान, पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला. एका महिलेने लिफ्टचे बटण दाबले. तेव्हा लिफ्ट सुरु होऊन दरवाजा उघडला गेला. तेव्हा आतमध्ये ही तरुणी असल्याचे दिसून आले. तब्बल १४ तास ही तरुणी लिफ्टमध्ये अडकून पडली होती.

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार यांनी सांगितले की, मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. लिफ्टमधून तिची सुटका झाल्यानंतर तिच्या पालकांची आमची काही तक्रार नाही, असे सांगितले आहे. तरीही या संपूर्ण प्रकारात तांत्रिक जबाबदारी कोणाची आहे, याची आम्ही चौकशी करत आहोत.

या प्रकारामुळे नामांकित महाविद्यालये तसेच शासकीय, खासगी कार्यालये असलेल्या व्यवसायिक इमारतींमधील सुरक्षा यंत्रणा, इमर्जन्सी अलार्म आणि बॅकअप पॉवर या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

You may have missed