Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रावर निसर्गाचे दुहेरी संकट: एका बाजूला उष्णतेची लाट, तर 26 जिल्ह्यांत वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’
पुणे : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, राज्यावर एकाच वेळी दोन टोकाच्या हवामान स्थितींचे संकट ओढावले आहे. भारतीय हवामान विभागाने २१ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील २६ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे विदर्भातील काही भागांत कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक होरपळून निघत आहेत.
राज्याच्या अंतर्गत भागात, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील २४ ते ४८ तास कळीचे ठरणार आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड परिसरात ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. अचानक येणाऱ्या या पावसामुळे शेती कामात व्यत्यय येण्यासोबतच काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात सध्या प्रचंड आर्द्रता वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच, या भागात ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मात्र पावसाचा जोर अधिक राहू शकतो, तिथे वाऱ्याचा वेगही जास्त असेल.
एककीकडे पाऊस हजेरी लावत असताना विदर्भातील स्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. अकोला, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशांच्या पुढे सरकला आहे. या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान खात्याने नागरिकांना उन्हापासून वाचण्यासाठी दुपारी घराबाहेर पडणे टाळण्याचे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.
