Pune Cyber Crime News | 81 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या सतर्कतेमुळे आपल्या मुलाला डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर फसवणुकीपासून वाचवले

Pune Cyber ​​Crime News | 81-year-old senior citizen's vigilance saves his son from cyber fraud like digital arrest

पुणे : Pune Cyber Crime News | सायबर चोरटे हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवुन त्यांचे बँक खाते रिकामे करताना प्रामुख्याने दिसून येते. पण, निगडी येथील एक तरुण व त्याची पत्नी यांना सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्ट करुन ठेवले होते. या तरुणाने आपल्या ८१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या वडिलांना सांगितले. त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन आपल्या मुलाची व सुनेची होणारी संभाव्य फसवणुकीपासून वाचविले.

निगडी परिसरात राहणार्‍या एका तरुणाला रविवारी १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता व्हॉटसअप कॉलद्वारे एकाने संपर्क साधला. समोरील व्यक्तीने तो मुंबई पोलीस क्राईम ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगितले. तरुणास त्याच्या नावाचे पार्सल पकडण्यात आले असून त्या पार्सलमध्ये ५ वेगवेगळे पासपोर्ट तसेच एम डी ड्रग्ज मिळून आले आहेत, असे सांगितले. तुम्हाला आमचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचे चौकशीला सामोरे जावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर हा तरुण व त्याची पत्नी यांना सिग्न हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास लावले. त्याद्वारे व्हिडिओ कॉल केला. अधिकारी सांगत नाही तोपर्यंत कॉलसमोरुन जाता येणार नसल्याबाबत धमकावण्यात आले. थोड्या वेळाने पोलीस गणवेशातील बनावट अधिकार्‍याने चौकशी करुन पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यात येईल, असे सांगितले. ही गोष्ठ कोणाला सांगू नका, याबाबत धमकी दिली. ते दोघे डिजिटल अरेस्ट असल्याचे सांगितले.

१९ एप्रिल रोजी सकाळी ११ पासून २० एप्रिल दुपारी अडीच वाजेपर्यंत सिग्नल नावाचे अ‍ॅपद्वारे व्हिडिओ कॉल करुन तरुणाकडून त्याचे बँक खात्याची माहिती व आधारची माहिती घेण्यात आली. तरुणास बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले होते. तरुणाने त्याच्या म्युच्यूल फंडमधून १२ लाख रुपये काढण्याची विनंती केली होती. ही रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर ते सायबर गुन्हेगारांना पाठवून देणार होता. या प्रकाराबाबत तरुणाने त्याचा मोबाईल फोन दूर ठेवून त्याने ८१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या वडिलांना सांगितले.

त्यावेळी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सोपान बोधवड यांना संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. पोलीस अंमलदार सोपान बोधवड, मुकुंद वारे व निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार स्नेहा म्हस्के हे या तरुणाच्या घरी गेले. त्यांनी हा तरुण व त्याची पत्नी यांना हा डिजिटल अरेस्ट या फसवणुकीबाबत सविस्तर माहिती देऊन सायबर फसवणुकीपासून वाचवले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक व रहिवासी सोसायटी यामध्ये सायबर गुन्ह्यांबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे हा प्रकार ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणून दिला. त्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आभार व्यक्त केले.

You may have missed