Pune PMC News | जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील नाल्यावर बांधकाम करणार्या जिल्हा पोलिसांना नोटीस पाठवा; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश
पुणे : Pune PMC News | चतुश्रृंगी टेकडीवरून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून अभिमानश्री सोसायटीकडून बाणेर रस्त्याच्या दिशेने जाणारा नैसर्गिक नाला दस्तुरखुद्द जिल्हा पोलिसांकडून बांधकामासाठी बुजविण्यात येत आहे. यामुळे अभिमानश्री व परिसरातील सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने नोटीस पाठवा असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते ऍड. निलेश निकम यांनी यासंदर्भात राम यांना निवेदन देउन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील फोटोग्राफ्स पाहून आयुक्त राम यांनी गांभीर्य ओळखून तातडीने आदेश दिले. ऍड. निकम यांनी सांगितले, की बाणेर रस्त्यावरील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून वाहणार्या नैसर्गिक नाला बुजवून त्याठिकाणी इमारत बुजवण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या नाल्यात कचरा असल्याने नाल्यातील पाणी लगतच्या अभिमानश्री सोसायटी व लगतच्या सोसायट्यांमधील बंगल्यांमध्ये शिरले होेते. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर महापालिका प्रशासनाने नाल्याची सफाई केली होती. नुकतेच जिल्हा पोलिसांनी नाला बजुवूनच बांधकाम सुरु केल्याने यंदाच्या पावसाळयात भिषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्याची पाहाणी करायला गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली. आयुक्तांनी तातडीने जिल्हा पोलिसांना नोटीस पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
