Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात हवामानाचे दोन टोक; विदर्भात ‘रेड अलर्ट’सह उष्णतेचा हाहाकार, तर कोकण-पुण्यात पावसाची हजेरी

rain

पुणे : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दोन वेगळे रंग पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विदर्भ आणि मराठवाडा तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला आहे, तर दुसऱ्या बाजूला दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने आज, २१ मे रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी अत्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे, तर मुंबईसह किनारपट्टीच्या भागात मात्र वाढत्या आर्द्रतेमुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांना आजसाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांत गेल्या काही दिवसांत पारा थेट ४७ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून, विदर्भात गेल्या १२ वर्षांतील ही सर्वात भीषण उष्णतेची लाट मानली जात आहे. वर्ध्यामध्ये सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर नागपूर आणि चंद्रपूरमध्येही तापमान ४६ अंशांच्या पुढे गेले आहे. या तीव्र उष्णतेमुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून, नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला. अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण, कोरड्या वाऱ्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून पुढील ५ ते ७ दिवस विदर्भाला यातून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

दुसरीकडे, राज्यातील पश्चिम आणि दक्षिण भागात मात्र दिलासादायक चित्र आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर (घाट माथ्यासह), लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर परिसरात कालपासूनच पावसाळी वातावरण तयार झाले असून कमाल तापमानात २ ते ३ अंशांची घट झाली.

मुंबई आणि उर्वरित कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास, येथे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांच्या आसपास असले, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अत्यंत जास्त असल्याने मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून २६ मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी, पुढील पाच दिवसांत मुंबई आणि कोकण पट्ट्यातील तापमानात हळूहळू घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

You may have missed