Pune Crime News | पुणे : कुख्यात बंडू आंदेकरने जेलमधून रचला रक्तरंजित कट? ‘वनराज’ हत्येच्या बदल्यात अक्षय म्हस्के ‘टार्गेट’

Pune Crime News | Pune: Notorious Bandu Andekar hatched a bloody conspiracy from jail? Akshay Mhaske 'targeted' in revenge for 'Vanraj' murder

पुणे : Pune Crime News | शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाने डोके वर काढले असून बालाजीनगर परिसरातील अक्षय म्हस्के यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्यामागे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा उद्देश असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पूर्वनियोजित कटाचा संशय

सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीने हा हल्ला नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वनराज आंदेकर यांच्या भरचौकातील हत्येनंतर आंदेकर टोळी बदल्याच्या प्रतीक्षेत होती. त्याच पार्श्वभूमीवर अक्षय म्हस्के यांना लक्ष्य करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. अक्षय म्हस्के हे वनराज हत्येप्रकरणातील आरोपी आकाश म्हस्के यांचे भाऊ आहेत.

जेलच्या भिंतीआडून सूत्रे हलली?

सध्या कारागृहात असलेल्या बंडू आंदेकरने जेलमधूनच हल्ल्याचे सूत्र हलवले का? या दिशेने पोलिस तपास सुरू आहे. त्याच्यासह मुलगा कृष्णा आंदेकर, रामजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडू आंदेकरला कारागृहात भेटणाऱ्यांची माहितीही तपासली जात आहे.

पोलिसांची जलद कारवाई

घटनेनंतर अवघ्या काही तासांत पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आफ्ताफ शरीफ सय्यद Aftaf Sharif Syed (रा. भाग्यदेवनगर, वैशाली नर्सिंग होम, कोंढवा खुर्द), ऋषी प्रसाद मोहन आंबट Rishiprasad Mohan Ambat (वय २१, रा. चुडामण तालीमजवळ, नाना पेठ), आवेज अशपाक शेख Awez Ashpak Shaikh (वय २६, रा. गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे Vedanta Srinivas Temgire (वय १९, रा. भवानी पेठ, पालखी विठोबा चौक), अमन फारूक बागवाले Aman Farooq Baghwale (वय २१, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठ)  यांचा समावेश आहे. हे सर्व आंदेकर टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वनराज हत्येचा वचपा?

पोलिस तपासानुसार, वनराज आंदेकर हत्येचा बदला घेण्यासाठीच अक्षय म्हस्के यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा. याआधी आयुष कोमकर आणि गणेश काळे हत्या प्रकरणांमुळेही शहरातील टोळी संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे हा हल्ला गँगवॉरच्या नव्या अध्यायाची सुरुवात मानला जात आहे.

जखमीवर उपचार सुरू

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अक्षय म्हस्के यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला असून आंदेकर टोळीच्या इतर सदस्यांवरही नजर ठेवण्यात आली आहे.

You may have missed