Pune Crime News | पुणे : बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करुन मार्केटयार्डमधील गाळ्यांवर हक्क मिळविण्याचा प्रयत्न, सहकारनगर पोलिसांकडून माधव पांडुरंग बोराटे आणि रुपेश अशोक समेळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | सातारा रोडवरील धनकवडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कुलमुखत्यार पत्राची नोंदणी करुन त्याद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यांवर दावा करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत क्षितीज खेडकर (वय २७, रा. अंजली अपार्टमेंट, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन माधव पांडुरंग बोराटे Madhav Pandurang Borate (वय ७३, रा. पिंगळे फार्म हाऊस, कोरेगाव पार्क), रुपेश अशोक समेळ Rupesh Ashok Sameel (वय ५२, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सातारा रोडवरील धनकवडी येथी सह दुय्यम निबंधक कार्यालयात ४ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग बोराटे यांच्या वारसांनी त्याचे इस्टेटीवर आई कमलाबाई पांडुरंग बोराटे यांच्या नावावर रजिस्टर हक्कसोड करुन दिलेले आहे. कमलाबाई बोराटे यांनी मृत्युपत्राद्वारे सर्व मालकी हक्क थोरला मुलगा रवींद्र बोराटे यांना दिले होते. ते फर्मचे सर्व व्यवहार पहात होते. फर्मवरील कर्जदेखील त्यांनीच फेडले होते. २७ डिसेंबर १९९६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रोपरायटर रवींद्र पांडुरंग बोराटे यांच्या नावे भाडेपट्टा रजिस्टर करण्यात आला. रवींद्र बोराटे यांचे १८ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले. त्यांची सर्व मिळकत त्यांची पत्नी इंग्रीड रवींद्र बोराटे यांच्याकडे मालकी हक्काने आली. पांडुरंग बोराटे यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने इंग्रीड यांच्या बाजूने निर्णय दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीनेही इंग्रीड बोराटे यांचे एकट्याचे नावे वारस नोंद केली. त्यानंतर २९ जून २०२४ रोजी फिर्यादी क्षितीज खेडकर आणि हेमंत पिशोरीलाल मलिक यांच्या नावाने इंग्रीड बोराटे यांनी मृत्युपत्र तयार केले. त्यामध्ये त्यांनी गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळे व भाजीपाला विभागातील गाळे क्रमांक १८२, १८३, १८४ व ८६ ही मिळकत या दोघांच्या नावे केली. या मृत्युपत्राचे न्यायालयाने ७ जानेवारी २०२५ रोजी फियार्दी व मलिक यांना प्रोबेट सर्टिफिकेट दिले आहे. त्यानुसार २४ जानेवारी २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी मार्केटयार्ड मधील या गाळ्यांबाबत या दोघांच्या नावाची नोंद केली आहे. तेव्हा पासून या गाळ्यांचे लाईट बील, प्रॉपर्टी टॅक्स, बाजार समितीचा सेस, हमाली, तोलाई, लेव्ही व इतर देखरेख खर्च फिर्यादी करत आहेत.
त्यानंतर २६ डिसेंबर २०२५ रोजी पणन संचालनालय यांनी फिर्यादी यांच्या नावाने नोटीस काढली. त्यामध्ये माधव बोराटे व त्याच्यातर्फे कुलमुखत्यार पत्र धारक रुपेश अशोक समेळ यांनी फिर्यादी विरोधात पणन संचालनालयाकडे अर्ज केला होता. माधव बोराटे यांनी रुपेश समेळ यांना दिलेले बनावट कुलमुखत्यार पत्र फिर्यादींच्या निदर्शनास आले. हे बनावट कुलमुखत्यार पत्र हवेली तील सह दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात ४ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदविले आहेत. हे कुलमुखत्यार पत्र १३ पानी असून त्यापैकी पणन संचालनालय यांना फक्त ६ पानांचा समावेश करुन सादर केले आहे. त्याद्वारे फसवणुक करण्याचा प्रयत्न केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे तपास करीत आहेत.
