Pune ACB News | कृषी उपसंचालक किरण जाधव यांच्या पुणे, नवी मुंबई, सातार्‍यातील 9 ठिकाणी पहाटेपासून सर्च सुरु, 15 ठिकाणी शेत जमिनी

Pune ACB Trap Case

पुणे : कृषी उपसंचालक किरण जाधव यांच्यावर पहाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या विविध पथकांनी त्यांच्या पुणे, सातारा, नवी मुंबई येथील ९ ठिकाणी असलेल्या फ्लॅटमध्ये छापा टाकून सर्च सुरु केला आहे. (Deputy Director of Agriculture, Kiran Jadhav)

किरण जाधव व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर एकूण १५ शेत जमिनी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याशिवाय पुण्यात ५ फ्लॅट, नवी मुंबई येथे एक, सातारा जिल्ह्यातील दहीवडी या जन्मगावी ३ अशा एकूण ९ ठिकाणी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. त्या ठिकाणी लाच लुचपत प्रतिबंधक शाखेची वेगवेगळी पथके पहाटेपासून सर्च घेत आहेत.

किरण जाधव व त्यांची पत्नी संगिता जाधव यांच्या एकूण मालमत्तेसंदर्भात उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे परिक्षण कालावधीमध्ये एकूण उत्पन्न ३ कोटी ४० लाख २० हजार ६३६ रुपये आहे. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरुन त्यांचा या कालावधीतील एकूण खर्च हा ३ कोटी ५५ लाख २२ हजार ६७ रुपये झाल्याचे दिसून आले आहे. तसेच त्यांची एकूण मालमत्ता ४ कोटी २२ लाख ७३ हजार ४९९ रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरुन किरण जाधव व त्यांची पत्नी संगिता जाधव यांनी परिक्षण कालावधीमध्ये एकूण ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपये इतकी अपसंपदा धारण केल्याचे निष्पन्न झाले आहे.

किरण जाधव हे मुळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी गावचे आहेत. त्यांचे बी एस्सीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील कृषी महाविद्यालयात झाले. एम एस्सी त्यांनी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठातून केले आहे. ते कृषी अधिकारी म्हणून कृषी विभागात ४ जून  १९९४ रोजी भरती झाले आहेत. तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी मंडल कृषी अधिकारी, खंडाळा, म्हसवड येथे मंडल कृषी अधिकारी, विभागीय कृषी सह संचालक ठाणे, विभागीय गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण पुणे), तंत्र अधिकारी, प्राचार्य रामेती पुणे – सहायक संचालक, संचालक (मृद संधारण व पा़ क्षे़ व्य), तंत्र अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी (दक्षता पथक) पुणे, कृषी उपसंचालक, प्रकल्प संचालक (आत्मा) सोलापूर, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) या ठिकाणी नोकरी बजावली आहे.

जाधव हे कृषी अधिकारी झाल्यानंतर रघुनाथ कृष्णा थोपटे यांची कन्या संगिता यांच्याबरोबर २८ मे १९९६ रोजी विवाह झाला. लग्नात स्त्रीधन म्हणून ५० तोळे सोन्याचे दागदागिने व संसारोपयोगी वस्तु, भांडी इत्यादी साहित्य देण्यात आले होते. जाधव यांचे सासरे रघुनाथ थोपटे हे कृषी सहायक म्हणून ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे सरकारी नोकरीस होते.

जाधव यांना श्रवण जाधव (वय २८) आणि मुलगी श्रेया जाधव(वय २५) अशी दोन मुले आहेत.  कृषी संचालक किरण जाधव यांच्यावर पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांची मालमत्ता असलेल्या पुणे, नवी मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील ९ ठिकाणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेगवेगळ्या पथकाने हाऊससर्च सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे.

You may have missed