Pune ACB News | कृषि उपसंचालक किरण जाधव यांच्यावर उत्पन्नापेक्षा 4 कोटी 37 लाख अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ACB ने केला गुन्हा दाखल
पुणे : Pune ACB News | तत्कालीन कृषी उपसंचालक आणि दक्षता पथक व तत्कालीन तंत्र अधिकारी खते संचालक किरण जाधव व त्यांच्या पत्नीवर उत्पन्नापेक्षा तब्बल ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची (१२८ टक्के) अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (Deputy Director of Agriculture, Kiran Jadhav)
किरण श्यामराव जाधव आणि संगीता किरण जाधव (दोघे रा. कुंदन पार्क, शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. किरण जाधव सध्या सोलापूर येथील आत्मा येथे उपसंचालक, प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एप्रिल २०२५ मध्ये कृषी विभागातील परवान्यांच्या संदर्भात आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांचे २ डिसेंबर २०२५ रोजी किरण जाधव यांची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
३१ वर्षातील उत्पन्नाची तपासणी
या उघड चौकशीमध्ये ४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ या परीक्षण कालावधीचे उत्पन्नाची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांनी वैध उत्पन्नापेक्षा ४ कोटी ३७ लाख ७४ हजार ९३० रुपयांची (१२८टक्के) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले. ही अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण करण्यासाठी त्यांना त्यांची पत्नी संगीता किरण जाधव यांनी अपप्रेरणा दिल्याने त्या दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले तपास करीत आहेत.
