Pune ACB Trap News | एकाच पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांवर एकाच दिवशी सापळा कारवाई होण्याची पहिलीच घटना; गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली लाच मागणारा एक हवालदार चुतुभुर्ज तर दुसरा लाचेची रक्कम घेऊन पळाला
पुणे : Pune ACB Trap News | दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली लाच मागणार्या एकाच पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांवर एकाच दिवशी सापळा कारवाई करण्याची पहिलीच घटना शिरुर पोलीस ठाण्यात घडली. एका कारवाईत ११ हजार रुपये घेताना पोलीस हवालदाराला पकडण्यात आले. दुसर्या कारवाईत ९५ हजार रुपयांची लाच घेऊन पोलीस हवालदार पळून गेला आहे.
सतीश नाथाराव मुंढे Satish Natharao Mundhe (वय ४६) असे लाच घेऊन पळून गेलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
शिरुर पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सतीश मुंढे याच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना अटक न करण्यासाठी व गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी मुंढे याने १ लाख रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार ३० सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. शिरुर पोलीस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलीस चौकीत या तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा सतीश मुंढे याने स्वत:साठी व वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला १ लाख रुपये व नंतर तडजोडीअंती ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ३० सप्टेंबरला रात्री टाकळी हाजी पोलीस चौकी येथे सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून सतीश मुंढे याने ९५ हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी त्याला सापळा पथकाची चाहूल लागली. लाच रक्कम घेऊन तो पळून गेला आहे. त्याचा शोध घेतला जात असून शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई जुने शिरुर पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली. शिवाजी ज्योतीराम बनकर Shivaji Jyotiram Bankar (वय ४४, रा. स्वप्नपूर्ती निवास, घोलेगाव रोड, शिरुर) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार व त्यांचे आई, वडिलांच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात १९ ऑगस्ट २०२६ मध्ये अतिक्रमण करुन मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर याच्याकडे आहे. तक्रारदार व त्यांच्या आई वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार बनकर याने तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी अटकेच्या भितीने बनकर याला ५ हजार रुपये दिले. बनकर याने उर्वरित १० हजार रुपये घेऊन २९ सप्टेंबर रोजी बोलावले असल्याची तक्रार २९ सप्टेंबर रोजी मिळाली. या तक्रारीची २९ सप्टेंबर रोजी जुने शिरुर पोलीस ठाण्यात पडताळणी करण्यात आली. त्यात तक्रारदार याच्याकडून ४ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करुन उर्वरित ११ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
जुने शिरुर पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी सापळा रचून तक्रारदाराकडून ११ हजार रुपये स्वीकारताना हवालदार बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण तावरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब गदादे, अभंग ऋषिकेश अभंग तसेच पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे, पोलीस अंमलदार अश्विन कुमकर, विकास आडके, पोलीस हवालदार सोनवणे यांनी केली आहे.
