Pune Crime News | प्रकल्पामध्ये पुरविलेल्या कामगारांची बनावट बिले सादर करुन बिलिंग मॅनेजरने इतरांच्या मदतीने दीड कोटींचा अपहार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | खराडी येथील प्रकल्पामध्ये पुरविण्यात आलेल्या कामगारांपेक्षा अधिकचे कामगार पुरविल्याचे लेबर कॉन्ट्रॅक्टरांच्या मदतीने दाखविले. त्यांच्या मोबदल्याची बनावट बिले तयार करुन बिलिंग मॅनेजरने कंपनीच्या १ कोटी ४६ लाख ६६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खराडी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनुप कुमार सन ऑफ भास्करन लंबियार (वय ५३, रा. पार्क ट्रयुरकोईस, पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी खराडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ईस्माईल शेख (वय ३६, रा. ईशा मिरेल सोसायटी, कोंढवा), रिझवान शेख (वय ४५, रा. पश्चिम बंगाल), खुशबश अन्सारी (वय ४७, रा. उदयरपूर, सिसवा, झारखंड), संजीव लाला पंडित (वय ४२, रा. धुनीशी, जि. वैशाली, बिहार) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खराडी येथील मिलेनियम इंजिनिअरिंग अॅन्ड कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि. या कंपनीचे पी ग्रॅन्ट रोड, के ५७ आणि के ६५ गेरा कॉमर्स झोन येथील प्रकल्पात २०१८ ते २३ मे २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत कॉन्ट्रॅक्स विभागात ईस्माईल शेख हा बिलिंग मॅनेजर म्हणून नोकरी होता. इतर तिघे हे लेबर कॉन्ट्रक्टर आहेत. त्याने इतर तिघांशी संगनमत केले. खराडी येथे कपंनीचे सध्या चालू असलेला के ५७ प्रोजेक्ट व पूर्वीचा पूर्ण झालेला के ६५ या नावाने असलेला प्रोजेक्ट अशा दोन्ही प्रोजेक्टच्या साईटवर कंपनीस पुरविलेल्या कामगारांच्या मोबदल्याची बिले, के ५७ व के ६५ प्रोजेक्टमधील कॉन्ट्रॅक्ट विभागाचे बिलिंग ऑफीसमधील संगणकावर बनावट रित्या बिले तयार केली. कंपनीला कामगार पुरवले नसतानाही जादा कामगार पुरविल्याचे दाखवून तिघांच्या नावाने बिले काढली. अशा प्रकारे कंपनीचा विश्वासघात करुन कंपनीची १ कोटी ४६ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. लेखापरिक्षणामध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईस्माईल शेख सध्या कंपनीत काम करत नाही. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.
