Pune Crime News | आईविषयी अपशब्द वापरल्याच्या गैरसमाजातून तरुणाच्या डोक्यात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, सुतारवाडी येथील आयटीआय मैदानाजवळील रात्री उशीराची घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  पैसे परत देण्यावरुन झालेल्या वादाच्या प्रकरणात मध्यस्थी करणार्‍या तरुणाने आईविषयी अपशब्द वापरल्याच्या गैरसमाजातून तिघांनी तरुणाच्या डोक्यात सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सुतारवाडी  येथील आयटीआय मैदानाच्या गेटजवळ रात्री साडेअकरा वाजता घडली आहे.

सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. कल्याण रेसिडन्सी, शिवालय सोसायटी, साई चौक, पाषाण) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यांचा भाऊ कृष्णा रामप्रकाश  शर्मा (वय ३६, रा. सुसगांव) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बंटी ऊर्फ आशिष चक्रनारायण  (Bunty, alias Ashish Chakranarayan) व त्याच्या दोन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुतारवाडी येथील आयटीआय ग्राऊंड गेटच्या बाहेर रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ सहदेव शर्मा हा शेअर मार्केटिंगचे काम करतो. ज्ञानेश्वर भोईन याने बंटी ऊर्फ आशिष चक्रनारायण  याच्याकडून ३ लाख रुपये घेतले होते. ते काही केल्या ज्ञानेश्वर परत करीत नव्हता. त्याबाबत दोघांचा मित्र सहदेव हा मध्यस्थी करीत होता. अशातच सहदेवने बंटी याच्या आई व पत्नीबाबत अपशब्द वापरले, असा गैरसमज होऊन बंटीने सहदेवला मारण्याची धमकी दिली होती. सहदेव आणि ओकांर डोईफोडे हे रात्री उशिरा चालण्यासाठी पाषाण येथील साई चौकात गेले होते. त्यावेळी तेथे बंटी व त्याचे दोन साथीदार अचानकपणे आले. बंटी याने त्यांना आयटीआय ग्राऊंड गेटच्या बाहेर चर्चा करण्याकरीता येण्यास सांगितले. ते तेथे गेले.

बंटी व त्याचे दोन साथीदार आले. बंटी याने सहदेव याला  तु माझी पत्नी व आईबद्दल अपशब्द का वापरलेस, असे विचारताच त्यांच्यामध्ये वाद चालू झाला. त्यामुळे बंटी व त्याच्या दोन साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला सहदेव याने प्रतिकार केला असता बंटी याने कंबरेला लावलेला कोयता काढून सहदेवच्या छाती, डोके व इतरत्र शरीरावर सपासप वार करुन भोसकण्यास सुरुवात केली. त्यात सहदेवाच्या हातावर सुद्धा मोठी जखम झाली. सहदेव जखमी अवस्थेत रस्त्यावर खाली पडला असता बंटी व त्याच्या दोन साथीदारांनी सहदेवचे हात पाय धरुन त्याला ओढत फुटपाथवर आणले. पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्याचे पाहिल्यावर तिघे जण पळून गेले. त्यानंतर सहदेव याच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सहदेव याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला तसेच डोक्याच्या मध्यभागी गंभीर जखमा झाल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप तपास करीत आहेत.

You may have missed