Pune Crime News | पाण्याच्या टाकीत पडून 14 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याप्रकरणी एल अॅन्ड टी कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एल अॅन्ड टी कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.
निखिल नितीन साठे (वय १४) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई मंजु नितीन साठे (वय ३०, रा. तळजाई वसाहत) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एल अॅन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा व कंत्राटदार यांच्यावर निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तळजाई येथील बायोगॅस प्रकल्पाशेजारी महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या टाकीमध्ये १३ ऑक्टोंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल हा १३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाळेतून घरी आला. थोडा वेळाने तो मित्राबरोबर खेळायला बाहेर गेला. साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र ओम कसबे याने घरी येऊन कळविले की, निखिल पाण्याच्या टाकीमध्ये पडला. फिर्यादी, त्यांची सासु व दीर हे पळत तेथे पोहचले. तोपर्यंत तेथे राहणारे उद्धव लहू कांबळे यांनी अग्निशामक दलाला कळविले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी निखिलला टाकीतून बाहेर काढले. त्यावेळी त्याला उभे राहता येत नव्हते. उपचारासाठी त्याला भारती हॉस्पिटल येथे नेण्यात आले. या अपघातामध्ये निखिल याच्या दोन्ही पायाचे गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले असून कमरेला मार लागला आहे. तसेच त्याचे पोटाला व हाताला मार लागला आहे.
त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर या ठिकाणी कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाय योजना, संरक्षक जाळी, इशारा बोर्ड लावलेला दिसून आला नाही. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील पाणीपुरवठा विभागात जाऊन चौकशी केली. त्यात या टाकीचे काम पुणे महापालिकेने एल अॅन्ड टी कंपनीला दिले असून या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा व कंत्राटदार करत आहे. फिर्यादी यांनी प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा व कंत्राटदार यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे़ पोलीस उपनिरीक्षक महेश मोरे तपास करीत आहेत.
महत्त्वाची संपादकीय टीप : सदर बातमी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीतील तपशिलांच्या आधारे देण्यात आली आहे. फिर्यादीमध्ये केलेले आरोप म्हणजे आमचा स्वतंत्र निष्कर्ष किंवा मत नाही. संबंधित आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून निश्चित होईल.
