Pune Crime News | साईड देण्यावरुन झालेल्या वादात आयटी अभियंत्याचे नाक फ्रॅक्चर करणाऱ्यांवर महिन्याभरानंतरही चंदननगर पोलिसांची नाही कारवाई !

Pune Crime News | Even a month after the IT engineer’s nose was fractured in an argument over giving way, Chandanagar police have still taken no action!

खराडी-तुकाराम नगर मारहाण प्रकरण: सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याचे चित्र स्पष्ट ! नाकाचे हाड फ्रॅक्चर, तरीही 33 दिवसांनंतर आरोपी मोकाट!

पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतल्यानंतरही आरोपींना अटक नाही; चंदननगर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

पुणे : Pune Crime News | खराडी येथील तुकारामनगरमध्ये कारला साईड देण्यावरुन झालेल्या वादात आयटी अभियंत्याच्या नाकावर लोखंडी रॉडने ठोसा मारुन नाक फ्रॅक्चर करण्यात आले. या प्रकरणात फिर्यादीच्या पाठपुराव्यानंतर अजामीनपात्र कलमांचा समावेश केला गेला आहे. या घटनेला एक महिना होऊन गेला तरी चंदननगर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या वकिलांनी चंदननगर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

याबाबत गिरीश हंसराज ताकवले (वय ३४, रा. प्रसुन सर्वम सोसायटी, तुकारामनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अकोलेड सोसायटीमधील दीपेंद्र रामपाल सिंग भदोरिया, स्वाधीन शहा, गौरव सुशील शर्मा, सुदेश खिवंसरा, प्रशांत डांगे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीश ताकवले हे २४ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता अकोलेड सोसायटीसमोरुन खराडी बायपासकडे जाणाऱ्या रोडवर त्यांची स्कोडा कुश्क ही कार घेऊन घराकडे जात होते. त्यावेळी समोरुन बीएमडब्ल्यु कार भरधाव आली. त्यातील दीपेंद्र रामपाल सिंग भदोरिया व इतरांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या कारची काच फोडली. भदोरिया याने त्यांच्या नाकावर हातातील लोखंडी रॉडने ठोसा मारला. त्यामुळे त्यांचे नाक तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले. त्यावर फिर्यादी यांनी मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानुसार चंदननगर पोलिसांनी या गुन्हयामध्ये 118(2), 189 (2), 190, 191 (2) व 324(2) कलमांची वाढ केली आहे.

पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात रस्त्यावरुन गाडीला साईड देण्याच्या कारणावरुन वाद झाला. त्यातून दीपेंद्र रामपाल सिंग भदोरिया यांनी फिर्यादी यांच्या स्कोडा गाडीची मागील काच हाताने मारुन फोडली. ते पाहून गौरव शर्मा यांच्या पत्नीने स्वाधीन शहा यास भांडणाची माहिती फोनवरुन दिली. त्यानंतर स्वाधीन शहा व त्यांचे मित्र सुदेश खिवंसरा, प्रशांत डांगे यांच्यासह घटनास्थळी जाऊन त्यांनी फिर्यादीस लाकडी दांडक्याने तसेच हाता पायांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे, हे स्पष्टपणे सीसीटीव्ही पंचनाम्यात दिसून आले आहे, असे चंदननगर पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांना कळवुन या गुन्ह्यात अजामीनपात्र कलमांची वाढ केली.

त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. परंतु, न्यायालयाने आरोपींना अंतरिम संरक्षण फेटाळलेले आहे. पोलिसांनी न्यायालयात आरोपींचे मोबाईल बंद असून लोखंडी रॉड जप्त करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. असे असताना गुन्हा घडल्यानंतर एक महिन्यानंतरही आरोपी मोकाट असून चंदननगर पोलिसांनी एकाही आरोपीला अद्याप अटक केली नसल्याचा दावा फिर्यादी व त्यांच्या वकीलांनी केला आहे.

चंदननगर पोलिसांच्या तपासावर थेट प्रश्न?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची ओळख स्पष्ट होत असताना पोलिसांनी त्यांच्या घरांना, कामाच्या ठिकाणांना भेटी देऊन किंवा मोबाईल लोकेशन तपासून शोधमोहीम राबवली का? सीसीटीव्ही पुरावे, ससून रुग्णालयाचा फ्रॅक्चर अहवाल आणि न्यायालयाचे कोणतेही संरक्षण नसताना आरोपी अद्याप मोकाट का? 

“आमच्यावर हल्ला झाला. सीसीटीव्हीमध्ये घटना दिसत आहे. वैद्यकीय पुरावे आहेत. गंभीर कलमही वाढवण्यात आले आहे. मग न्याय मिळण्यासाठी सामान्य नागरिकाने आणखी किती दारे ठोठवायची?” असा सवाल उपस्थित होत आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करावी

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस आधिकारी यांनी लक्ष घालून चंदननगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी असे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

You may have missed