Pune Crime News | सॉफ्टवेअर कंपनीत गुंतवणुक करायला सांगून 1 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन नर्हे पोलिसांनी एकाला केली अटक
पुणे : Pune Crime News | प्रोजेक्ट आणण्यासाठी ओळखी असल्याचे सांगून सॉफ्टवेअर कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून एका व्यावसायिकाची १ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन नर्हे पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत तुषार तेजराम घडाळे (वय ४६, रा. सेलेस्टियल सिटी, रावेत) यांनी नर्हे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रविण दत्तू शेळके Pravin Dattu Shelke (वय ४०, रा. गणेश व्हिला सोसायटी, धायरी) यांना अटक करण्यात आली आहे. निता प्रविण शेळके आणि रिचर्ड पात्रिदगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नर्हे येथील नवले आयकॉन येथील प्रिस्टन इन्फो ग्लोबल सोल्युशन प्रा. लि. येथे २५ मे २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण शेळके, निता शेळके व रिर्चड यांनी संगनमत करुन कंपनीकरीता प्रकल्प मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कंपनीचे बनावट अॅग्रिमेट व कागदपत्रे पाठवून २ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. फिर्यादी व त्यांचे मित्रांचा ई मेलद्वारे केलेला पत्रव्यवहार व करारनामे प्राप्त करुन ही कंपनी स्वत:चे मालकीची असल्याचे भासवुन संचालक असल्याचे सांगितले. आय टी कंपनी स्थापन करण्याकरीता विश्वास संपादन करुन कोणताही प्रकल्प देणार नसल्याचे माहिती असताना ही बनावट कागदपत्रे व करारनामा यांचा वापर करुन भागिदारीमध्ये कंपनी स्थापन केली. या कंपनीत १ कोटी ८५ लाख ६० हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले.
तसेच कंपनीमध्ये कृष्णा जी या नावाने ट्रेनर म्हणून नेमून तुषार तेजराम घडाले व त्यांचा मित्र विवेक भारती यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नर्हे पोलिसांनी प्रविण शेळके यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करीत आहेत.
