Pune Crime News | महिला पत्रकारांचा छळ करुन कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी पुणे टाइम्स मिरर व्यवस्थापनाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल; तीन महिला पत्रकारांचे गंभीर आरोप
पुणे : Pune Crime News | पुण्यातील ‘लेक्सिकॉन मीडिया प्रा. लि.’ Lexicon Media Pvt. Ltd. (पुणे टाइम्स मिरर – Pune Times Mirror) या माध्यम संस्थेत काम करणार्या तीन महिला पत्रकारांचा छळ करुन त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या महिला पत्रकारांचा सेवा करार संपला असताना त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे काम करवुन घेणे, त्यानंतर त्यांना अचानक कामावरुन काढून टाकणे, गेले जवळपास वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे रेकॉर्ड संस्थेच्या वेबसाईटवरुन नष्ट केल्याचा आरोप या महिला पत्रकारांनी केला असताना चंदननगर पोलिसांनी संस्थेच्या मॅनेजमेंट हेड प्रियांका शर्मा, संचालक, चेअरमन पंकज शर्मा, एच. आर. निकिता जाधव आणि पुणे मिररचे सीईओ आकाश राजपुरोहित यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
सुरक्षेच्या आणि भविष्यातील रोजगाराच्या कारणास्तव तक्रारदार महिला पत्रकारांनी आपली नावे गोपनीय ठेवली आहेत. त्यांनी संगनमताने पूर्वनियोजित कट रचून व्यावसायिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
व्यवस्थापनाने कार्यस्थळावर अत्यंत असुरक्षित वातावरण तयार करुन गंभीर मानसिक अत्याचार व छळ करुन त्यांनी या महिला पत्रकारांना नोकरीवरुन काढून टाकण्याची वारंवार धमकी दिली. तसेच १८ मे रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक या पत्रकारांना कामावरुन काढून टाकले. एवढेच नव्हे तर, त्यांचे अधिकृत ईमेल आणि कामाचे डॅशबोर्ड तातडीने ब्लॉक करून त्यांची ‘डिजिटल नाकेबंदी’ करण्यात आली. यामुळे पत्रकारांनी केलेल्या कामाच्या नोंदी आणि महत्त्वाचे पुरावे त्यांच्यासाठी उपलब्ध राहिले नाहीत. हा प्रकार म्हणजे त्यांच्या कामाच्या अधिकारावर गदा आणणारा आणि पुरावे नष्ट करण्याचा सायबर गुन्हा असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण छळवणुकीमुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक दडपणामुळे थेट आत्महत्येस प्रवृत्त होईल अशी परिस्थिती निर्माण केली गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आमचे कायदेशीर करार संपलेले असतानाही, आमच्या आर्थिक गरजेचा गैरफायदा घेऊन मॅनेजमेंटने आमच्याकडून वर्षभर अहोरात्र काम करून घेतले. आमच्या श्रमाचा व्यावसायिक वापर केल्यानंतर, कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक आम्हाला वाºयावर सोडण्यात आले.” तसेच, ज्या गोष्टीचा मूळ पत्रकारितेशी संबंध नाही, त्या ‘डॅशबोर्ड’चे पूर्णपणे खोटे आणि बनावट कारण पुढे करून आपली व्यावसायिक प्रतिमा डागाळण्याचा कट रचला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रियांका शर्मा यांनी त्यांची कायदेशीर कार्यमुक्ती पत्र आणि अनुभव प्रमाणपत्र दडपशाही करुन रोखून धरले आहे. जेणे करुन त्यांना इतर कोठेही नोकरी मिळू नये आणि त्यांची कारकीर्द कायमची उद्धवस्त व्हावी, असे कृत्य केले आहे. त्याला कंपनीच्या मुख्य संचालकांनी देखील पूर्ण पाठिंबा दिल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे. चंदननगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
