Pune Crime News | ‘डी एस कुलकर्णी’च्या जप्त केलेल्या कार खरेदी करुन देत असल्याचे सांगून पैसे घेऊन एजंट झाला फरार; अनेकांची लाखो रुपयांची केली फसवणूक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या बँकेने जप्त केलेल्या गाड्या सोडवून स्वस्तात विक्री करण्याचे आमिष दाखवून कार खरेदी विक्री करणारा एजंट अनेकांकडून पैसे घेऊन फरार झाल्याचे समोर आले आहे.

मोहसीन मोहम्मद मुल्ला Mohsin Mohammad Mulla (रा. अमन हाईटस शेजारी, मोमीनपुरा, गुरुवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या एजंटचे नाव आहे. याबाबत अदनान शब्बीर शेख (वय २३, रा. नाईक बिल्डिंग, मोमीनपुरा, गुरुवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या अनेक आलिशान गाड्या जप्त केल्या. यातील काही गाड्यांवरील कर्ज थकल्याने बँकांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी शेख हे मोहसीन मुल्ला याला लहानपणापासून ओळखतात. तो जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करतो. नोव्हेंबर २०२४ रोजी त्याने फिर्यादी यांना मोबाईलमध्ये एक जुनी इनोव्हा क्रिस्टा कारचा फोटो दाखविला. ही कार चांगल्या कंडिशनमध्ये असून ती सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर उभी आहे. ही कार डी एस कुलकर्णी यांची असून कारचे कर्जाचे हप्ते थकल्याने कोटक बँकेने ताब्यात घेतली आहे. कोटक बँकेत थकीत कर्जाची रक्कम भरुन त्यांच्याकडून एन ओ सी आली की नंतर मी तुम्हाला कार विकत देतो, असे सांगितले. कारची किंमत ५ लाख रुपये ठरविण्यात आली. ५ लाख रुपये बँकेत भरुन कार सोडवून आणल्यावर तुम्हाला देतो, असे सांगून त्यांच्याकडून नोव्हेंबर २०२४ मध्ये ५ लाख रुपये घेतले.

त्यानंतर त्यांनी सातत्याने कारबाबत पाठपुरावा केल्यानंतरही मुल्ला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा त्यांना संशय आल्याने त्यांनी दिलेले ५ लाख रुपये परत मागितले. तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला. तुझ्याविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे फिर्यादी यांनी सांगितल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पैसे परत घेण्यासाठी त्यांनी वेळोवेळी फोन केले. पण, त्याने उत्तर दिले नाही. परिसरात शोध घेतल्यावरही तो मिळून आला नाही. त्याचा शोध घेत असताना गंज पेठ परिसरातील इम्रान उस्मान सय्यद, वसीम शफिक ताजमत, अहमद सज्जाद खान यांना व इतर लोकांकडून गाडी खरेदीच्या बहाण्याने त्याने पैसे घेऊन गाडी न देता फसवणूक केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे तपास करीत आहेत.

You may have missed