Indian Aircraft Crash In Assam | आसाममधील जोरहाट एअरबेसवर भीषण दुर्घटना; भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जवानांना वीरमरण
नवी दिल्ली / आसाम : Indian Aircraft Crash In Assam | आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर शनिवारी सकाळी घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत पाच जवानांना वीरमरण आले असून, सहवैमानिक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन इंजिन असलेले अँटोनोव्ह एएन-३२ हे लष्करी वाहतूक विमान नियमित सैन्य पुरवठा आणि साहित्य वाहतुकीच्या मोहिमेवर होते. जोरहाट हवाई तळाजवळ लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाला आणि काही क्षणांतच त्याने पेट घेतल्याने परिसरात आगीचे आणि धुराचे प्रचंड लोट उसळले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन मदत पथके आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. तसेच जखमींना तातडीची मदत मिळावी यासाठी जोरहाटमधील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
या अपघातात स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम या पाच जवानांना वीरमरण आले. जखमी झालेल्या सहवैमानिकाची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
या दुर्घटनेत दोन अग्निवीरांचाही समावेश असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर भारतीय हवाई दलाने संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, अपघाताची नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, २०२६ मधील आसाममधील ही दुसरी मोठी हवाई दुर्घटना ठरली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात कार्बी आंगलॉन्ग जिल्ह्यात वायुसेनेचे सुखोई विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे संरक्षण व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत आणि तांत्रिक देखभालीबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
