Pune Crime News | पुणे : 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा सारसबागेजवळ कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; पूर्ववैमनस्यातून घातपात की आणखी काही? पोलिसांकडून तपास सुरू
पुणे : Pune Crime News | सारसबागेजवळ शुक्रवारी सकाळी कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. शुभ्रत बाळासाहेब बनसोडे Shubhrat Balasaheb Bansode (वय २५, रा. कवडी गाव, लोणी काळभोर) असे त्याचे नाव आहे. शुभ्रतचा मृत्यु कसा झाला याची माहिती शवविच्छेदनानंतर समजणार असून त्यामागे पूर्ववैमनस्य की आणखी काही कारण आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.
याबाबत त्याचा भाऊ शुभम बाळासाहेब बनसोडे (वय २८, रा. कवडी गाव, मांजरी फार्म, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ्रत बनसोडे हा २६ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता वडिलाचा जेवणाचा डबा घेऊन घरातून निघाला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. हडपसर गाडीतळावरील रिक्षा स्टॅन्डजवळ त्याने वडिलांना डबा दिला आणि घरी परत जात आहे, असे सांगून तो निघून गेला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सौरभ कडु या त्याच्या मित्राला फोन करुन त्याने हडपसर गावामध्ये भेटण्यासाठी ये असे सांगितले. तो तिथे गेला असता, मी चाललो असे त्याने सांगितले. फक्त मी तुला फोन करेल, तेव्हा पैसे दे, असे म्हणून तो तिथून निघून गेला. त्याने शंभर रुपये पाठवले. त्यानंतर काही वेळाने त्याचा फोन बंद झाला. फिर्यादी शुभम बनसोडे हे नाईटशिफ्ट करुन घरी आल्यावर आईने त्यांना शुभ्रत अजून घरी आला नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दिवसभर सर्व नातेवाईक व परिसरात शोध घेतला़ पण तो मिळून आला नाही़ शुभ्रत बनसोडेने २६ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजता मित्राला मी जात आहे, असे सांगून गेला तो परत आला नाही, त्याचे कोणीतरी अपहरण केले असावे, अशी त्यांनी २८ ऑक्टोंबर २०२६ रोजी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर मधून गेलेला शुभ्रत बनसोडे हा सारसबागेत कसा कधी आला याचा तपास केला जात आहे.
दादावाडी जैन मंदिर येथील एकाने परिसरातील कारमधून वास येत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर स्वारगेट पोलीस घटनास्थळी गेले. ही कार काही दिवसांपासून तेथे उभी असलेली दिसून आली. मागच्या सीटवर एक जण बसलेला दिसत होता. पोलिसांनी दरवाजा उघडताच त्याचा मृतदेह दरवाजातून खाली आला. या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
शुभ्रतच्या मृत्युमागे कोणाचा हात आहे का? यादृष्टीने आम्ही वर्कआऊट करत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी सांगितले.
