Pune Crime News | खंडणीसाठी मुलाचे अपहरण करुन पिस्तुलची नळी त्याच्या तोंडात टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या गेल्या ८ महिन्यांपासून फरार कुख्यात गुन्हेगार तुषार हंबीर याला फुरसुंगीमधून अटक
पुणे : Pune Crime News | खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करुन पिस्तुलाचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या ८ महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार तुषार हंबीर याला फुरसुंगी येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
तुषार नामदेव हंबीर Tushar Namdev Hambir (वय ४०, रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, गर्दी, मारामारी व आर्म अॅक्ट यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत़.
ही घटना कापूरहोळ ते नारायणपूर रोड दरम्यान ३ मार्च २०२६ रोजी दुपारी एक वाजता घडला होता. याबाबत महेश ऊर्फ लखन काशिनाथ दळवी (वय ४२, रा. कापूरहोळ) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे कापूरहोळ येथे आनंद वाईन्स व आनंद हॉटेल आहे. त्यांचा मुलगा दुपारी दुचाकीवरुन दुकानातून घरी जात होता. त्यावेळी घराजवळ काळ्या कारवरुन आलेल्या ५ ते ६ जणांनी त्याचे अपहरण करुन त्याला गाडीतून जबरदस्तीने पळवुन केले. हे समजल्यावर दळवी हे त्या कारचा पाठलाग करु लागले. त्यांनी पोलिसांना तातडीने ही माहिती दिली. त्यांनी शिरवळपर्यंत त्या कारचा पाठलाग केला. परंतु, पुढे ते दिसले नाही. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी येथे त्यांचा मुलगा पृथ्वीराज व त्याला घेऊन पळून गेलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे मित्रांकडून समजले. पृथ्वीराज याच्याकडे त्यांनी चौकशी केल्यावर सांगितले की, मला त्यांनी दोघांच्या मध्ये बसवून पळवुन नेले. मला हाताने मारहाण करु लागले. तेव्हा मी काय झाले आहे, ते मला सांगा, अशी विचारणा केली.
कारमधील दोघांनी तुला माहिती नाही का घरामध्ये काय चालले आहे, त्यावेळी मी त्यांना मला काही एक माहिती नाही, असे म्हणालो. त्यावर चालकाचे बाजूला समोर बसलेल्याने सांगितले की, तुम्ही आमचेवर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला जीवंत सोडणार आहे का?, आज तुला मारुनच टाकतो, असे म्हणून एकाने त्याचे हातातील पिस्तुलची नळी माझे तोंडात टाकली. दुसर्याने हातातील कोयता दाखविला. मी घाबरुन गप्प बसलो. थोड्या वेळाने समोर एक पोलीस गाडी आली असल्याचे दिसल्याने चालकाने कार शेतातील रोडने वळवुन जोरात पळवु लागला. तेव्हा पोलीस गाडीही पाठलाग करु लागली. तेव्हा त्यांनी गाडी थांबवुन मला कारमधून रोडचे कडेला ढकलून देऊन ते कार जोरात पुढे घेऊन जात होते. कारचालकास कंट्रोल न झाल्याने कार रोडच्या कडेला स्लीप होऊन पलटी झाली. त्यानंतर कारमधील ५ जण शेतात पळून गेले, असे पृथ्वीराज दळवी याने सांगितले. त्यावरुन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याच्या तपासात तुषार हंबीर व त्याच्या टोळीने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी या पूर्वी अटक केली आहे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तरीही तुषार हंबीर सापडत नव्हता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तुषार हंबीर हा हडपसर भागात येणार अशी माहिती मिळाली. त्यानंतर २९ ऑक्टोंबर रोजी फुरसुंगी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुषार हंबीर याला अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर हे तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, पोलीस अंमलदार रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, तुषार भोईटे, चेतन पाटील, आणि भारत मोहळ यांनी केली आहे.
