Pune Crime News | पुणे : गणेशोत्सवात भाविकांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद! विश्रामबाग पोलिसांची 4500 किलोमीटरची मोहीम; गुजरात, हरियाणातून तिघांना अटक
पुणे : Pune Crime News | गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरून पसार झालेल्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करत पोलिसांनी गुजरात आणि हरियाणात शोधमोहीम राबवून तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत ९ गुन्हे उघडकीस आले असून, १३ लाख रुपयांचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या कारसह एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजय समशेरन विनोदकुमार रुपसिंग कोळी Ajay Shamsher Vinodkumar Rupsingh Koli (वय २०, रा. समसाबाद, पलवल, हरियाणा), अमन समशेर अनिलकुमार नारायणसिंग कोळी Aman Shamsher Anilkumar Narayansingh Koli (वय २४, रा. आदर्श कॉलनी, पलवल, हरियाणा) आणि दीपक समशेर राजूभाई सापसिंग Deepak Shamsher Rajubhai Sapsing (वय २१, रा. हिरानगर कॉलनी, पलवल, हरियाणा) अशी आहेत.
गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेत चोऱ्या
पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांचे दागिने आणि मोबाईल चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या प्रकरणांचा विश्रामबाग पोलिसांकडून तपास सुरू होता. तपासादरम्यान संबंधित आरोपी चोरी केल्यानंतर हरियाणात पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गुजरातमध्ये सापडला पहिला धागा; हरियाणात दोन साथीदारांना पकडले
तपासादरम्यान या प्रकरणातील एक आरोपी गुजरातमधील अरवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुजरात पोलिसांच्या मदतीने संबंधित आरोपीला या गुन्ह्यात ताब्यात घेऊन चौकशी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत आरोपीने गणेशोत्सवादरम्यान चोरी केल्याची कबुली दिली. त्यातून त्याच्या इतर दोन साथीदारांची माहिती समोर आली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या सहकार्याने पलवल परिसरात शोधमोहीम राबवून दोघांना पकडले.
९ गुन्ह्यांची उकल; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिस तपासात आरोपींनी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत ९ चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून १३ लाख रुपये किमतीचे दागिने तसेच गुन्ह्यांसाठी ये-जा करण्याकरिता वापरलेली कार जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २३ लाख रुपये आहे.
विश्रामबाग पोलिसांच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले आणि सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे आणि रमेश लाहिगुडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक उमेश कारके, पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी तसेच पोलिस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, साहिल शेख, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात आणि नितीन बाबर यांनी ही कामगिरी बजावली.
गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कारवाईमुळे गणेशोत्सवातील चोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे.
