Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | श्री महालक्ष्मी मंदिरात आयशरचे संचालक सुनिल भागवत यांच्या हस्ते महिला शास्त्रज्ञांचा सन्मान, विज्ञान, शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव (Video)
पुणे : Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन परिषदेचे (आयशर) संचालक डॉ. सुनिल भागवत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते विज्ञान व शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कर्तृत्व गाजविलेल्या महिला शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला.
प्रा. डॉ. सुवर्णा दातार, डॉ. तेजश्री भावे, डॉ. पुराबी गाराई, डॉ. शिल्पा जैन, डॉ. मंजु मदान या महिला शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, उत्सव प्रमुख तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, युवराज लाहोटी, विशाल सोनी, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुनिल भागवत यांनी सांगितले की, सरंक्षण आणि शिक्षण क्षेत्रात आजवर अनेक महिलांनी गौरवपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांची परंपरा आपण पुढे चालू ठेवली आहे, याचा खूप आनंद होतो. विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात जबाबदारी आणि त्याचा परिणाम हे खुप महत्वाचे असते. विज्ञान समाजाला उत्तरदायी असले पाहिजे , असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी सांगितले होते. पुढील पिढी ही स्पेस टेक्नालॉजीची आहे. या पिढीचे प्रश्न सोडविण्यावर आपण काम करावे.
भरत अग्रवाल यांनी सांगितले की, नवरात्रोत्सवाच्या ९ दिवस उत्सवात नारी शक्तीचा सन्मान करण्यात येतो. आपल्यासारख्या संशोधक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने मानवी जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कार्याचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
यावेळी युवराज लाहोटी यांनी प्रास्ताविक केले. विशाल सोनी यांनी महिला शास्त्रज्ञांचा परिचय करुन दिला. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
