Pune Crime News | पुणे : पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला, त्यांच्या दिशेने 2 राऊंड फायर केल्याप्रकरणी वॉन्टेड असलेल्या ‘शाहरुख’ आणि ‘फारुख’ यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या; छत्रपती संभाजीनगरमधून केली अटक
पुणे : Pune Crime News | डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सशस्त्र दरोड्याशी संबंधित गुन्ह्यात दीर्घकाळापासून फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा परिसरातून जेरबंद केले आहे. आरोपी २०२४ पासून पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शाहरुख कदीर खान पठाण Shahrukh Kadir Khan Pathan (वय २८) आणि फारुख कदीर खान पठाण Farooq Qadir Khan Pathan (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही अजिंठा-सिल्लोड परिसरातील जंजाळा गावचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिनव पथ परिसरात सहा जण कथितरित्या सशस्त्र दरोड्याच्या तयारीत होते. त्यावेळी बीट मार्शलने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी संशयितांनी धारदार शस्त्राने बीट मार्शलवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. परिस्थिती दरम्यान बीट मार्शलने आरोपींच्या दिशेने दोन राऊंड फायर केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर डेक्कन पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला तसेच शस्त्रविषयक कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासून पोलिसांकडून पाहिजे आरोपींचा शोध सुरू होता. मात्र, आरोपींचा संभाव्य वावर असलेला परिसर डोंगराळ आणि जंगल भागात असल्याने त्यांना पकडण्यात अडचणी येत होत्या.
२२ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-५चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांचे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने अजिंठ्याजवळील जंजाळा गावाच्या दुर्गम भागात पोहोचले.
पोलिसांनी सापळा रचून शाहरुख पठाण आणि फारुख पठाण या दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, दत्तात्रय काटम, संदीप जाधव, पोलीस अंमलदार शहाजी काळे, प्रताप गायकवाड, अकबर शेख, राहुल ढमढेरे, उमाकांत स्वामी, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, नासेर देशमुख, सुधीर सोनवणे, अविनाश इंगळे, कुलदीप पवार, शशिकांत नाळे, राहुल गोसावी, नेत्रिका अडसुळ, जयश्री भालेराव, श्रीदेवी फाळके व मयुरी पालवे यांचे पथकाने केली आहे.
