Pune Crime News | पुणे :  रिक्षाचालकाच्या डोक्यात वीट घालून खून; चक्कर येत असल्याने घरी जाऊन झोपला, तो पुन्हा उठलाच नाही! भवानी पेठेत खळबळ

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत रिक्षाचालकाच्या डोक्यात वीट घातल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील भवानी पेठ परिसरात घडली. मारहाणीनंतर संबंधित रिक्षाचालक घरी गेला. चक्कर येत असल्याने आणि अशक्तपणा जाणवत असल्याने तो झोपला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा उठलाच नाही. शवविच्छेदनात अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

असलम युसुफ खान (वय ३०, रा. काशेवाडी, चमनशहा दर्ग्याजवळ, भवानी पेठ) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी अमोल अनिल अंबवणे (वय २६, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. मृताचे भाऊ मुझम्मील युसुफ खान (वय ३३) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास मनशहा दर्ग्याजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम खान हे रिक्षा चालवण्याबरोबरच वाहन दुरुस्तीचे काम करत होते. आरोपी अमोल अंबवणे हा मिळेल तेथे काम करत होता. घटनेच्या रात्री दोघेही मनशहा दर्ग्याजवळ बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर असलम खान यांनी जवळ पडलेली वीट उचलून अमोलला मारली. त्यानंतर अमोलने तीच वीट उचलून असलम यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने असलम यांना दगडाने मारहाण केली. त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाणीनंतर असलम खान हे घरी गेले. त्यांना चक्कर येत होती, तसेच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे ते घरी जाऊन झोपले. मात्र, झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनात डोक्याला झालेल्या मारहाणीनंतर अंतर्गत रक्तस्रावामुळे असलम खान यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षानंतर खडक पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. मृताचे भाऊ मुझम्मील खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमोल अंबवणे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान पवार करीत आहेत.

You may have missed