Pune Crime News | जबरी चोरीचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर मार्केटयार्डमध्ये दुसऱ्या प्रयत्नात 30 लाखांची लुट; लुटीतून खरेदी केलेली कार, बुलेट, मोबाईल, दागिने असे 24 लाखांचा ऐवज स्वारगेट पोलिसांनी केला जप्त
पुणे : Pune Crime News | सॅलसबरी पार्क येथे व्यावसायिकाला मारहाण करुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न फसल्यावर त्यांनी आणखी तिघा साथीदारांबरोबर घेऊन मार्केटयार्डमधील व्यापार्याच्या कामगाराला लुटून ३० लाख रुपयांची रोकड लुटली होती. या लुटीतील पैशांतून त्यांनी आय २० कार, बुलेट, मोबाईल, दागिने, घड्याळ व ६ लाख ५० हजार रुपये असा २४ लाख रुपयांचा ऐवज स्वारगेट पोलिसांनी जप्त केला आहे.
यश प्रविण सोनवणे Yash Pravin Sonawane (वय २४, रा. मांजरी रोड, मांजरी), निहाल नवनाथ अडागळे Nihal Navnath Adagale (वय १९, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मार्केटयार्डमधील व्यावसायिक हे २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ५ लाख रुपये घेऊन दुचाकीवरुन सॅलसबरी पार्क येथील घरी जात होते. त्यावेळी त्यांना अडवून जखमी करुन पैशांची बॅग पळवुन नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही बॅग फिर्यादी यांनी सोडली नाही. त्यामुळे चोरटे पळून गेले होते.
सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळु शिरसट व पोलीस अंमलदार अक्षय भोगे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तसेच मार्केटयार्ड, बिबवेवाडी, वानवडी, कोंढवा, हडपसर, मगरपट्टा सिटी, केशवनगर, मुंढवा परिसरातील सुमारे एक महिनाभर ३०० ते ३५० सीसीटीव्ही पाहून संशयित आरोपींना मार्क करुन त्यांना ओळखुन त्यांची नावे निष्पन्न केली. त्यांचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला. त्यात त्यातील एक जण हा मुंढवा परिसरात राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरुन त्याला घराच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने इतर दोघा साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन पोलिसांनी यश सोनवणे व निहाल अडागळे यांना अटक केली. पोलीस कोठडीत चौकशी केली असता हा जबरी चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर आणखी तिघांना सोबत घेऊन ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी सव्वा वाजता मार्केटयार्ड रोडवर एका व्यापार्याचे ३० लाख रुपये असलेली बॅग दरोडा टाकून चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या दरोडा टाकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी वाहने, कपडे, २ मोबाईल, खरेदी केले. त्यातील एक आय २० कार, १ बुलेट, १ अॅपल कंपनीचा १९ प्रो मोबाईल, साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने, १ जोड चांदीचे तोडे, २ अॅपल वॉच, १ लेडीज वॉच तसेच ६ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण २४ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, प्रदिपसिंग सिसोदे यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळु शिरसट, पोलीस हवालदार प्रदीप शिंदे, किरण रघतवान, पोलीस अंमलदार अक्षय भोगे, रमेश चव्हाण, नितीन क्षीरसागर, सोमनाथ बटुळे, युवराज राठोड, रोहित पोवार व करण ढापकर यांनी केली आहे.
