Pune Crime News | पुणे : धक्कादायक ! चुकीचे उपचार केल्याने 11 महिन्याच्या मुलीचा मृत्यु, चिन्मय हॉस्पिटलच्या डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | चुकीचे उपचार केल्याने एका ११ महिन्याच्या मुलीचा मृत्यु झाल्याबद्दल चिन्मय हॉस्पिटलचे डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह ६ जणांवर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेत चिन्मय हॉस्पिटलच्या नावाने नोंद असताना तेथे चिन्मय इन्स्टिट्युट ऑफ पेड्रियाट्रिक्स नावाने लहान मुलांचे हॉस्पिटल चालविले जात होते. तसेच बी ए असलेल्या महिलेला परिचारिका म्हणून नेमण्यात आले होते. या हॉस्पिटलच्या अनेक धक्कादायक बाबी या प्रकरणातून उघडकीस आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचा मृत्यु झाल्यानंतर डॉ. मुकुंद संगमनेरकर यांनी इतर डॉक्टर व परिचारिका यांना हाताशी धरुन संपूर्ण कागदपत्रे बदलण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
डॉ. मुकुंद संगमनेरकर (Dr. Mukund Sangamnerkar), डॉ. गणेश आरेकर (Dr. Ganesh Arekar), डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर (Dr. Radha Sangamnerkar), परिचारिका मनिषा शिंदे, सरिता सुतार (चिन्मय हॉस्पिटल, नवी पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अॅड. हनुमान दत्ताराव गिते (वय ३४, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना नवी पेठेतील चिन्मय हॉस्पिटल येथे २२ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान घडली आहे.
डॉ. मुकुंद संगमनेरकर हे बालरोगतज्ञ आहेत. ते चिन्मय हॉस्पिटलचे संस्थापक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. हनुमान गिते यांना आदिती ही ११ महिने १८ दिवसांची मुलगी होती. तिला उलटीचा त्रास होत असल्याने त्यांनी तिला चिन्मय नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. तेथील डॉ. श्रीधर जाधव यांनी मुलीला तपासले. तिच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. तिला अॅडमीट करावे लागेल, असे सांगून त्यांनी मुलीचे फोटो व व्हिडिओ काढून डॉ. मुकुंद संगमनेरकर यांना पाठवले. मुलीवर उपचार चालू केले. डॉ. श्रीधर जाधव व गणेश आळेकर यांनी अक्वालाईव्ह एन एस ५०० मिली चे सलाईन लावले. त्यांनी ते पूर्ण स्पीडने दिले. त्यात २ इंजेक्शनही दिले. मुलीच्या पायाला सुरुवातीला हार्ट बिट मोजण्याचे छोटे मशीन लावले. मशिनचे चार्जिंग नसल्याने ते १० मिनिटात बंद पडले. त्यानंतर त्यांनी दुसरे मशीर आणले़ तेही चालले नाही.
मोठे मशीन आणले. ते फक्त टेबलवर ठेवले. चालू केले नाही. मुलीचे रक्ताचे नमूने लॅबला पाठविले. रात्री ८ वाजता डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आळेकर व परिचारिका मनिषा शिंदे हे वॉर्डमध्ये आले. तिचे वय विचारले. त्यानंतर डॉक्टरांनी जिन्याजवळ जाऊन चर्चा केली. डॉ. गणेश आळेकर यांनी बाळाला पाणी पाजू नका, असे सांगितले. थोड्या वेळाने डॉ. श्रीधर जाधव यांनी सांगितले की, ओआर एस दिले तरी चालेल. परत डॉ. गणेश आळेकर यांनी सांगितले की, ओआरएस पण देऊ नका. रात्री ९ वाजता पहिले सलाईन संपल्यानंतर तेथील परिचारिका सरिता संदीप सुतार हिने दुसरे अक्वालाईव्ह एन एस ५०० हे सलाईन लावले. त्यानंतर डॉ. गणेश आळेकर वॉर्डमध्ये आले व रिपोर्ट नॉर्मल आहेत.
जास्त काही नाही़ पण जर पिवळी उलटी झाली तर आयसीयु असणार्या हॉस्पिटलला जावे लागेल, असे सांगून डॉ. गणेश आळेकर तेथून निघून गेल. रात्री १० वाजता मुलीने पिवळी उलटी केली. गिते यांनी तेथील नर्सला सांगितले, की तिने पिवळी उलटी केली आहे. तुम्ही डॉक्टरांना बोलवा. तेव्हा तिने सांगितले की, मुलीला दुसर्या हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल. परंतु डॉ. गणेश आळेकर वॉर्डमध्ये आलेच नाही. त्यांनी सरिता सुतार यांना मुलीला सलाईन देण्यासाठी हाताला लावलेल्या सुईद्वारे ओएनडेएम नावाचे इंन्जेक्शन दिले. रात्री साधारण ११ वाजून ५० मिनिटांनी सरिता सुतार वॉर्डमध्ये सलाईन चेक करण्यासाठी आल्या. त्यांनी मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या लक्षात आले की बाळ काहीच हालचाल करत नाही. श्वास देखील घेत नाही. त्यांनी डॉक्टरांना कळविले. १० -१५ मिनिटात डॉ. गणेश आळेकर, डॉ. संगमनेरकर व परिचारिका वॉर्डमध्ये आले. त्यांनी बाळाचा मृत्यु झालेला आहे, असे सांगितले.
अॅड. गिते यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार त्यांना सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले.
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. हा प्रकार घडल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दुसर्या मजल्यावर राहणारे डॉ. संगमनेरकर हे पळत पळत खाली आहे. त्यांनी बाळाची फाईल घाई घाईने ताब्यात घेऊन समोरील वॉर्डमध्ये लपवून ठेवली. डॉ. गणेश हे वॉर्डमध्य बराच वेळ होते. नंतर बाहेर येताना डॉ. गणेश यांच्या हातात फाईल नव्हती. मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी डॉ. गणेश आळेकर यांनी परिचारिकांच्या टेबलावर असलेले दैंनदिन औषध रजिस्टर (वही) ताब्यात घेतली. ते समोरील असलेल्या वार्डमध्ये लपवुन ठेवले. तसेच दैनंदिन औषध रजिस्टरमध्ये पण मुळ नोंदीमध्ये फेरफार करुन त्यावर खोट्या नोंदी केल्या आहेत.
त्यानंतर फिर्यादी यांचे सर्व नातेवाईक व पोलीस डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्या केबिनमधून बाहेर गेल्यानंतर डॉ. संगमनेरकर व डॉ. आळेकर यांनी चर्चा करुन ८ ते १० वेळा कोणालातरी कॉल व हॉटसअॅप कॉल करुन गिते यांच्या मुलीच्या रिपोर्ट फाईलमध्ये वारंवार फेरबदल केले. २२ मे २०२५ रोजी रात्री २ वाजून १८ मिनिटांपासून सकाळी साडे चार वाजेपर्यंत डॉ. संगमनेरकर व डॉ. आळेकर हे सतत फाईल कोणालाही न दाखवता त्यामध्ये सतत बदल करीत होते. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी रिपोर्ट फाईलची झेरॉक्स काढली.
सकाळी डॉ. श्रीधर जाधव हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी ओरिजनल बाळाची फाईल घेऊन त्यामध्ये आपल्या हाताने काहीतरी फेरबदल नोंद करुन त्याचे झेरॉक्स काढून पोलिसांना दिल्या. सर्व डॉक्टरांनी चर्चा करुन गिते यांना मृत्यु चे कारणाचा रिपोर्ट दिला. मृत्यु दाखल्यावर डॉ. श्रीधर जाधव यांनी सही केली. त्यामध्ये चुकीचे मृत्युचे कारण व चुकीची वेळ नमूद केलेली आहे. डॉ. श्रीधर जाधव हे थेट सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी बाळाचा मृत्यु झाला आहे, हे सुद्धा तपासले नाही. मृत्यु कधी झाला, कशामुळे झाला हे सुद्धा डॉ. जाधव यांनी तपासले नाही. तरीदेखील त्यांनी मृत्युचे कारण व वेळ नमुद करुन त्यांना खोटा मृत्यूचा दाखला दिला आहे.
बाळाला ५०० एम एल च्या दोन सलाईन बाटल्या दिल्या, तरी रिपोर्टमध्ये ३०० एम एल असे खोटे नमूद केले.
रिपोर्टमधील नाईट चॅटिंग मध्ये वेळ, टीम व इतर माहिती खोटी नमूद केली. त्यांचे मशीन बंद होते व या चार्टमध्ये बराच वेळेस खाडाखोड करण्यात आली आहे.
रिपोर्टमध्ये बाळाला कंटीनुअरली मॉनिटरीगमध्ये ठेवले होते, असे नमूद केले. परंतु, प्रत्यक्षात कोणतेही मॉनिटरिंग केले गेलेले नाही. वॉर्डमध्ये ऑक्सिजनची कोणतीही सुविधा नसताना देखील डॉक्टरांनी ऑक्सिजन दिला आहे, असे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
डॉ. संगमनेरकर हे रक्ताचे नमुन्यांचा रिपोर्ट २२ मे रोजी रात्री ८ वाजता आल्यानंतर वॉर्डमध्ये आले. त्यानंतर ते पुन्हा बाळाला तपासणी कामी आलेच नाहीत. त्यांनी पूर्णपणे परिचारिका हिच्या भरवश्यावर सोडले व घरी निघून गेले होते.
अॅड. गिते यांनी महापालिकेतून माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागविली. हॉस्पिटलमध्ये नोकरी करणारे डॉक्टर व परिचारिका यांची माहिती प्राप्त झाली. हॉस्पिटलच्या मालक डॉ. राधा मुकुंद संगमनेरकर यांनी अप्रशिक्षित परिचारिका सरिता सुतार यांना हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरीस ठेवले. त्यांना इतर परिचारिकांसारखा पोषाक घालण्यास दिला. त्यांचे शिक्षण बी ए झाले असताना त्यांना परिचारिका म्हणून नेमले. त्यांना डॉक्टरांच्या अनुपस्थितीत सलाईन देणे, इन्जेक्शन देणे अशी कामे करुन घेतली.
या केस पेपरवर हॉस्पिटलचे नाव चिन्मय इन्स्टिट्युट ऑफ पेडियाट्रिक्स असे नमूद केले आहे. त्यावरती चिन्मय नर्सिग होम या हॉस्पिटलचा शिक्का मारुन सही केलेली आहे. अॅड. गिते यांनी पुणे महानगर पालिका यांच्याकडे चिन्मय इन्स्टिट्युट ऑफ पेडियाट्रिक्स या हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मागितले. पण महापालिकेकडे कोणतेही रजिस्ट्रेशन झालेले नाही. या हॉस्पिटलचे नाव चिन्मय नर्सिग होत असे असून ते डॉ. राधा संगमनेरकर यांच्या नावे रजिस्टर आहे. असे असताना ते चिन्मय इन्स्टिट्युट ऑफ पेडियाट्रिक्स या नावाने केसपेपर देतात.
अॅड. गिते यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील कागदपत्रे घेऊन ससून रुग्णालयातील वैद्यकीय समितीकडे पाठवली. त्यात समितीने अभिप्राय दिला की, रुग्णाच्या उपचारामध्ये प्रचलित मानकांचा अवलंब करण्यात आलेले दिसून येत नाही. तसेच रुग्णावर योग्य सतत देखरेख केले गेले नाही़. अशा प्रकारचे रुग्णाच्या उपचारामध्ये उपचार करणार्या डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाला आहे, असा स्पष्ट लेखी अभिप्राय प्राप्त झाल्याने अॅड. गिते यांनी डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे तपास करीत आहेत.
