Pune Crime News | सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडी करणार्या रजिया सुलतान टोळीतील दोघांना विश्रामबाग पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात शोध घेऊन केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | सदाशिव पेठेत भर दिवसा घरफोडी करुन फरार झालेल्या रजिया सुलतान टोळीतील गुन्हेगारांचा दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात शोध घेऊन दोघांना गाझियाबाद येथून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
हबीब हफीज सैफी Habib Hafeez Saifi (वय ५०) आणि अकबर ऊर्फ सुलतान सैफी (वय ४१, दोघे रा. गाझियाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अपर्णा पुरुषोत्तम नायडु (वय ६८, रा. उष:काल बिल्डिंग, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचे फ्लॅट ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी पावणे तीन ते पावणेसहा बंद असताना चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरुन चोरट्यांनी घरातील १६६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व २५० ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरुन नेल्या होत्या.
तपास पथकातील पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन संशयित आरोपींचे छायाचित्र एकत्रित केले. त्यावरुन तपास सुरु असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे व पोलीस अंमलदार अनिस शेख यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हे आरोपी उत्तर प्रदेशातून गाझियाबाद येथील असल्याचे खात्रीशीर सांगितले. त्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस हवालदार नितीन मुंढे, पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात हे पथक २३ ऑक्टोंबर रोजी रवाना झाले. या पथकाने दिल्ली, हरियाना, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात तपास केला. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन गाझीयाबाद येथून दोघाना ताब्यात घेतले. तपासादरम्यान ते रजिया सुलतान टोळीमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपीकडून जवळपास १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
रजिया सुलतान टोळीचा दबदबा
रजिया सुलतान ही उत्तर प्रदेशातील टोळी आहे. रजिया सुलतान सैफी ही महिला टोळी चालवत होती. त्यावरुन या टोळीला रजिया सुलतान नाव पडले. ही टोळी देशभरातील विविध राज्यांमध्ये गुन्हे करते. दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशापासून बंगलुरुपर्यंत या टोळीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
अशी आहे यांची गुन्ह्याची पद्धत
हे आरोपी इतर राज्यांमध्ये येताना विमान किंवा अलिशान गाड्यांचा वापर करतात. जेणे करुन कोणाला संशय येणार नाही. ही टोळी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करुन दिवसा बंद घरे शोधत. त्यानंतर घरफोडी करुन दुसर्या राज्यात पळून जात असत.
सदाशिव पेठेतील घरात चोरी करताना एक जण खाली थांबला़ त्यानंतर दुसरा इमारतीत शिरला. त्याने घरफोडी करुन खाली आला. तोपर्यंत पहिला खाली पहारा देत थांबला होता. त्यानंतर दोघे पळून गेल्याचे दिसून आले होते.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस हवालदार नितीन मुंढे, पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात, सचिन कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, फिरोज इनामदार, नितीन बाबर यांनी केलेली आहे.
